कळंब :- शहरालगत असणा-या डिकसळ ग्रामपंचायत हद्दीतील साई मंगल कार्यालयात विनापरवाना प्रचारार्थ बैठक घेतल्यामुळे  सोलापूरचे माजी खासदार सुभाष देशमुख व अन्य दोघांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा कळंब पोलीस स्टेशन मध्ये दाखल  करण्यात आला आहे.
    डिकसळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संजय मस्के यांनी दिलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे की, दिनांक २७ मार्च रोजी  सकाळी ११:४५ ते दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार रोहन सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थ शहरालगतच्या साई मंगल कार्यालयात बैठक घेतली होती. या बैठकी संदर्भात कुठल्याही प्रकारची  परवानगी घेण्यात आली नव्हती.  त्यावरून सरकारी आदेशाचे उल्लंघन करुन आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी सुभाष देशमुख , समिर लक्ष्मिकांत देशपांडे, भगवान दत्ताञय देशपांडे यांच्यावर कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असुन या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिर्झा बेग हे करत आहेत.
 
Top