कळंब  -: लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे, यासाठी प्रशासन कामाला लागले असतानाच गाव स्तरावरील दररोजचा दैनंदिन अहवाल तालुका स्तरावरील नियंत्रण कक्षाला न कळवल्यामुळे कळंब तालुक्यातील २७ ग्रामसेवकांना उपजिल्हाधिकारी (निवडणूक) यांनी करणे दाखवा नोटीसा देऊन याबाबतचा खुलासा चोवीस तासाच्या आत मागविला आहे. या नोटीसांमुळे ग्रामसेवकांमध्ये खळबळ उडाली आहे.
    उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी कळंब येथे आचार संहिता कक्ष कार्यरत आहे. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी २१ मार्चला कळंब येथे अचानक भेट देऊन गावपातळीवर काम करणार्‍या गावकामगार तलाठी, पोलिस पाटील व ग्रामसेवक यांच्याकडून दैनंदिन माहिती घेण्याचे निर्देश दिले होते. आचार संहितेचे पालन होत आहे  का? यासह कायदा व सुव्यवस्थेसंबंधित माहिती घेण्याचे काम तालुका स्तरावरील नियंत्रण कक्षाकडून केले जात आहे परंतु गावकामगार तलाठी, ग्रामसेवक व पोलिस यापैकी २७ ग्रामसेवकांनी आपले मोबाईल बंद ठेवल्याने दैनंदिन अहवाल व माहिती मिळू शकली नाही. या अनुषंगाने २७ ग्रामसेवकांना दि. २६ मार्च रोजी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) यांनी कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या असून, चोवीस तासाच्या आत खुलासा देण्याचे कळविण्यात आले आहे.
 
Top