पांगरी (गणेश गोडसे) :- धोत्रे (ता. बार्शी) येथे चो-यांचे सत्र सुरूच असुन गावातील एकाची घरासमोर लावलेली दुचाकी मोटारसायकल अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. कांही दिवसांपुर्वी चोरटयांनी धोत्रे गावात एकाच रात्रीत अनेक घरे फोडुन जबरी चो-या करून लाख रूपयांचा ऐवज चोरून नेला होता .त्यामुळे पांगरी पोलिस ठाणे हदीत सर्वसामान्य नागरीकांमध्ये खळबळ उडाली होती.
    या घटनेबाबत तुळजापूर लाईव्‍हवर वृत्‍त प्रसिध्‍द होताच पांगरी पोलिसांनी तसदी घेत तात्काळ अज्ञात चोरटयांविरूदध गुन्हे दाखल केले होते. ही घटना ताजी असतानाच पुन्हा तीन दिवसांपुर्वी चोरटयांनी आपला मोर्चा दुचाकी गाडयांकडे वळवुन धोत्रे गावातील संदिप सायसराव खराटे (वय 32, रा.धोत्रे, ता.बार्शी) या केंद्रिय सुरक्षा पथकात सेवा बजावत असलेल्या जवानाची एम. एच. 13 एक्यु 9626 या क्रमांकाची दुचाकी मोटारसायकल अज्ञात चोरटयांनी गाडीचा हॅन्डल लॉक तोडुन चोरून नेली आहे. धोत्रे गावाला चोरटयांनी टार्गेट केल्यामुळे व गावात वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे गावात घबराटीचे वातावरण पसरले असले धोत्रेसह परिसरात पोलिस गस्त सुरू करण्‍याची मागणी होत आहे. पोलिस रात्र गस्तीला या भागात फिरकतच नसल्याचे लोकांनी सांगितले.
     फिर्यादी पांगरी पोलिसात फिर्याद दाखल करण्‍यासाठी गेले असता तुम्ही गाडीचा शोध घ्या चोरीची फिर्याद नंतर दाखल करू असे पोलिसांनी होते. याबाबत आज दि. 21 शुक्रवारी दुपारी पांगरी पोलिसात संदिप खराटे या तरूणाने दिलेल्या फिर्यादिवरून दुचाकीचोरीप्रकरणी अज्ञात चोरटयांविरूदध गुन्हा दाखल करण्‍यात आलेला आहे. अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.
 
Top