कळंब :-  ट्रॅक्टर व तीन चाकी टमटमची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोघे ठार तर सहाजण गंभीर जखमी झाले. ही घटना कळंब-येरमाळा रस्त्यावरील हॉटेल सनराईज समोर गुरूवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.
    याबाबत मिळालेली माहिती अशी की, कळंब शहराजवळील हॉटेल सनराईज समोर कळंबहून कन्हेरवाडीकडे जाणार्‍या तीन चाकी टमटम क्र.एमएच १२/ डी टी ४३८ ची हसेगाव (के) कडून कळंब कडे येणार्‍या ट्रॅक्टरला समोरून धडक बसली.यामध्ये बाबूराव ज्ञानोबा मिटकरी (वय ५५) व माणिक दिगंबर जाधव (वय ६0, दोघे रा.कन्हेरवाडी, ता.कळंब) हे दोघे जागीच ठार झाले.तर द्रौपदिबाई जाधव (वय ५५), तानाजी जाधव (वय ३३), राजेंद्र जाधव (वय ३५), रूक्मीण जाधव (वय ५0), नितीन जाधव (वय २६, सर्व रा. कन्हेरवाडी), खंडू शाहू बनसोडे (रा.भिवंडी) हे गंभीर जखमी झाले.या जखमींना कळंब येथील ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून यातील तिघांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या घटनेची कळंब पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास सपोनि मिर्झा बेग हे करीत आहेत.
 
Top