बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचा प्रचार करायचा या चक्रव्युहात अडकलेल्या राजेंद्र राऊत यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे शिवधनुष्य हाती घेण्याची स्पष्ट भूमिका व्यक्त केली. यावेळी राजेंद्र राऊत यांनी आपण कार्यकर्त्यांच्या बरोबर आहोत असा स्पष्ट संकेत यावेळी दिला.
राऊत यांनी कार्यकर्त्यांचे विचार ऐकून आपल भूमिका स्पष्ट करण्यासाठी बार्शीतील छत्रपती भवन येथे मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी तालुक्यातील राऊत गटाचे कार्यकर्ते, कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी मनोगते व्यक्त केली.
राऊत म्हणाले, मागच्या लोकसभा निवडणुकीवेळी माझा निर्णय चुकला व डॉ.पद्मसिंह पाटील यांचा प्रचार केला. निवडून आल्यावर त्यांनी कार्यकर्त्यांच्या कोणत्याही कामासाठी सकारात्मकता दाखवली नाही उलट प्रत्येक ठिकाणी अडवणूकीचे धोरण होते. कार्यकर्त्यांना व झालेल्या त्रासाने त्यांनी कोणत्याही परिस्थितीत यावेळी राष्ट्रवादीच्या डॉ.पद्मसिंह पाटील यांचा विरोध व शिवसेनेचा प्रचार करण्याची भूमिका घेतली आहे. कार्यकर्त्यांची भूमिका हीच माझी भूमिका आहे. कार्यकर्त्यांनी कोणाला मतदान करायचे ते करावे असे म्हणून मूकसंमती दिली आहे. मागच्या विधानसभेला राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आघाडीच्या पक्षाचे तिकीट मिळाले असतांना पक्षातून बंडखोरी करुन अपक्ष निवडणूकीस उभे करण्यात आले व कोणत्याही प्रकारचा आघाडी धर्म पाळला नाही. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका या निवडणूकीस पक्षाचे एबी फॉर्म अपक्षांना देण्यात आले. कोणत्याही पदाधिकार्‍यांवर पक्षांतर्गत कारवाई करण्यात आली नाही. आघाडीतून कोणत्याही अपक्षांना मंत्रीपद देणार नाही असा निर्णय झाला असतांना कॅबीनेट मंत्रीपद दिले आहे. जीवात जीव असेपर्यंत मी जनतेचा प्रतिनिधी म्हणून अपक्ष देखिल उभा राहणार असल्याचे राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.
वैरागचे संतोष निंबाळकर, रावसाहेब मनगिरे, अशोक बोकेफोडे, कॉंग्रेसचे ऍेड्.सुभाष जाधवर, राजा काकडे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी यावेळी विचार व्यक्त केले.
 
Top