बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: शासनाची मान्यता असलेल्या एमएससीआयटी या संगणक कोर्ससाठी बार्शी तालुक्यातूतन दरवर्षी साडेचार ते पाच हजार विद्यार्थी या कोर्सला नावे नोंदवितात यातून प्रत्येक विद्यार्थ्यांकडून तीन ते सव्वातीन हजार रुपये फी गोळा करण्यात येते. एमएससीआयटी या एकमेव कोर्ससाठी प्रत्येक वर्षी तालुक्यातून सुमारे पंधरा कोटींची उलाढाल होते. विद्यार्थ्याने हा कोर्स आपल्याच संस्थेत प्रवेश घेऊन पूर्ण करावा आणि आपल्यालाच जास्त कमिशन मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणात मार्केटिंग सुरु आहे व अनेक कमिशनवरील दलालांची फौज यासाठी कार्यरत आहे यातून एक प्रकारची जीवघेणी स्पर्धाच सुरु झाली आहे.
    शासकिय सेवेत नोकरी करायची असेल तर संगणकाची किमान पात्रतेमध्ये एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण असण्याची अट करण्यात आली. यानंतर संगणक शिक्षणाचा बाजार सुरु झाला आणि त्याचे लोण मोठ्या शहरापुरते मर्यादित न राहता हळूहळू छोट्या खेडेगावापर्यंत व थेट वाड्या वस्त्यांपर्यंत आले.
    शिक्षण देणे अथवा घेणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्‍न आहे ज्याचा त्याचा उपजिविकेचा अथवा आवश्यकता असली तरी सद्यस्थितीमध्ये त्यात मोठ्या प्रमाणात जीवघेणी स्पर्धा सुरु झाली आहे. खाजगी शिकवणीतून विविध विषयांचे शिक्षण देणार्‍या संचालक व माध्यमिक शाळांकडून थोडेफार पैसे देऊन विद्यार्थ्यांची नावे, पत्ता, वैयक्तिक संपर्क क्रमांकाच्या याद्या गोळा केल्या जातात आणि भाडोत्री व्यक्तींकडून सातत्याने फोन करुन मानसिक त्रास दिला जातो. पालक अथवा मुलाच्या फोनवर तुमचा मुला इयत्ता दहावीची परीक्षा दिली आहे, आता त्याला सुट्टी आहे, तो रिकाम्या वेळेत काय करेल ? त्याला आमच्या संस्थेतून एमएससीआयटी संगणक प्रशिक्षणाला पाठवा, आम्ही चांगला सराव करुन घेऊ, इतकी फी होते त्याला आम्ही इतकी सुट देऊ शकतो, हा कोर्स केला तर हा कोर्स अगदी मोफत, योगा मोफत, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मोफत, इंग्लिश स्पोकन कोर्स मोफत, पेन ड्राईव्ह मोफत, इंटरनेट हाताळणी प्रशिक्षण मोफत, अमक्या गावाला सहल नेण्यात येईल. एक रकमी फी भरणे शक्य नसल्यास हप्ते पाडून देऊ, तुमच्या घराच्या अगदी जवळ, लाईट गेल्यास जनरेटरची सोय, परीक्षेला पास करायची गॅरंटी, आमचेच शिक्षक परीक्षेला थांबून उत्तरे सोडवून देतील, तुम्ही १० विद्यार्थी आणले तर तुमच्या मुलाचा कोर्स मोफत निज्ञेल, इत्यादी प्रकारची प्रलोभणे दाखविण्यात येतात.
    बार्शीत शंभरापेक्षा जास्त संगणक प्रशिक्षण संस्था आहेत त्यापैकी काहीजणांकडून याचे मोठ्या प्रमाणात व्यावसायीकरण करण्यात आले आहे. यातील बोटावर मोजण्यासारख्या केंद्रांना या परीक्षा घेण्याची मान्यता आहे व त्यांना यातून मिळणारे कमिशन व ज्यांच्याकडे मान्यता नाही ते कमीशन मधून कमिशन कट करुन आपल्याकडील विद्यार्थी या संस्थांकडे वर्ग करतात. सदरच्या परीक्षेसाठी अगोदर मुख्य केंद्राची फीची रक्कम आगाऊ बँकेतीत खात्यावर जमा केल्याशिवाय ऍडमीशन होत नाही. त्याकरिता अनेक मान्यताप्राप्त नसलेल्या संस्था या प्रसंगी विविध खाजगी सावकाराकडून आपली गरज भागवतात व येणार्‍या विद्यार्थ्यांच्या ऍडमीशनची प्रक्रिया पूर्ण करतात. विद्यार्थ्याच्या ऍडमीशनसाठी एका ट्रेनिंग सेंटरचा झाला की दुसर्‍याचा अशा पाच सहा सेंटरकडून दररोज तीन ते चार वेळा फोन करुन माहिती विचारली जाते व विविध प्रलोभनांची माहिती सांगीतली जाते यातून अनेक पालक फोनच्या त्रासाला कंटाळले आहेत. शासनाची मान्यता असलेल्या कोर्सकरिता किती रक्कम घेण्यात याची याची मर्यादाही घालण्यात आली असली तरी अनेक प्रकारची प्रलोभणे व फीमध्ये सूट देण्यात येते यातून कोणत्या गुणवत्तेचे शिक्षण दिले जाते हे कोणाला सांगता येत नाही. प्रत्येक केंद्रासाठी संगणक संख्या, दिवसातील होणारे तास, विद्यार्थी संख्या यांचा मेळ घातल्यास त्या प्रशिक्षण केंद्रात मान्यतेपेक्षा जास्त विद्यार्थी कसे काय बसतील याचा अभ्यास केल्यास इतर ठिकाणी इतर मान्यता नसलेल्या केंद्रात या विद्यार्थ्यांचे शिक्षण होते हे लक्षात येईल असेही एका तक्रारदार पालकाने सांगीतले.
 
Top