लोहारा : आईसोबत धुणे धुण्यासाठी गेलेल्या एका 12 वर्षीय मुलासह एका मुलीचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना हिप्‍परगा (ता. लोहारा) येथे शुक्रवार दि. 28 मार्च रोजी दुपारी साडे बारा वाजण्‍याच्‍या दरम्‍यान घडली.
    खंडू अशोक गवारे (वय 12 वर्षे) व सरस्‍वती मल्लिनाथ कारले (वय 14, दोघे रा. हिप्‍परगा, ता. लोहारा) असे तलावात बुडून मृत्‍यू झालेल्‍यांचे नावे आहेत. हिप्परगा येथील शामाबाई अशोक गवारे आणि विजाबाई मल्लीनाथ कारले या दोघी गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर घरातील कपडे धुण्यासाठी गावालगतच्या तलावावर गेल्या होत्या. त्यांच्यासमवेत त्यांची मुले होती. पाण्यात उतरल्यानंतर खंडू गवारे व सरस्वती कारले हे दोघेही पाण्यात बुडाले. तलावातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे मुले बुडाली असल्याचा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान, शंकर पाटील यांच्या माहितीवरून लोहारा पोलिसांत सदरील घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे
 
Top