उस्मानाबाद :- जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी निवडणूक यंत्रणेने आवश्यक ती सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजले आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था भंग होऊ नये यासाठी विविध माध्यमातून पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विविध यंत्रणांच्या समन्वयाने काम करण्यावर भर दिला असून मागील निवडणुकात कायदा व सुव्यवस्थेस अडसर निर्माण करणा-यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
      याअंतर्गत जिल्ह्यातील 768 जणांना अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहेत. विविध नागरिकांनी शस्त्र परवाना घेतला होता. निवडणूक काळात 287 जणांनी आपली शस्त्रे सरकारजमा केली आहेत. निवडणूक काळात बेकायद दारु, पैसा यांचे वाटप होऊ नये यावरही निवडणूक यंत्रणा लक्ष ठेवून आहे. राज्य उत्पादन शुल्क, पोलीस, आयकर खात्यांच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात आदेश देण्यात आले असून असे प्रकार घडल्यास तात्काळ कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 212 लीटर दारु जप्त करण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक आदेशांतर्गत विविध कलमांतर्गत एकूण 1568 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
      कोणत्याही परिस्थितीत निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्या, असेही डॉ. नारनवरे यांनी विविध राजकीय पक्ष, उमेदवार आणि राजकीय कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.
     आदर्श आचारसंहिता भंग प्रकरणी आतापर्यंत 17 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.  
 
Top