नांदेड-येणार-येणार म्हणता म्हणता आज जागतिक महिला दिन आला. पाहता पाहता अलीकडच्या दहा वर्षात महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. प्रत्येक संघटनेला कार्यक्रमाचे महत्व पटले आहे. परंतु एखाद्या सामाजिक संघटनेने कार्यक्रम घ्यावा आणि मोकळे व्हावे एवढा साधा सोपस्कार राहिलेला नाही. आपलाच कार्यक्रम चांगला झाला पाहिजे अशी चुरस सर्वत्र पाहायला मिळते. महिला दिन साजरा करणे ही चांगलीच गोष्ट आहे. परंतु महिला दिन साजरा करुन आम्हा महिलांना त्यातुन काय मिळणार आहे? याच एका दिवसाची आम्ही का आठवण ठेवायची कार्यक्रम केल्यामुळे आम्हाला खरच यातुन प्रेरणा मिळते काय? याचा शोध घेण्याची हीच वेळ आज समाजात वेगवेगळे प्रश्‍न अनेक स्तरावरुन भेडसवत आहेत. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीने जमेलतसे प्रयत्न करायला हवेत. मोठमोठे कार्यक्रम साजरे न करता प्रत्यक्ष कृती करुन समाजात एक अदर्श निर्माण करावा महिला दिनाच्या निमित्ताने अनेक पुरस्कार दिले जातात. अर्थात कांही खरेदीही केली जातात. पुरस्कार देण्यासाठी सामाजिक कार्याचा आढावा मागवला जातो. परंतू आलेली माहिती कितपत खरी आहे याची शाहनिशा मात्र केली जात नाही. ही खेदाची बाब आहे.जागतिक महिला दिनाच्या आठवड्यात महिलांवर होणार्‍या अत्याचाराची संख्या कमी झालेली कोणी पहिलय काय?विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात स्त्रीमुक्ती चळवळीच्या झोतात वावरणार्‍या आजच्या शिक्षकांचा स्त्री विषयक दृष्टीकोन कोणता आहे. यावर उद्याच्या स्त्रियांचे विकसन अवलंबुन आहे.
    स्त्रिया अंत्यसंस्कार करु शकत नाहीत वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा आता अव्यवहारीक ठरते आहे. भारतीय संस्कृतीत घरातील सदस्याचा मृत्यू झाल्यास भाऊ, मुलगा, पुतण्या, नवरा, वडील यांनाच मुखाग्नी देण्याचे अधिकार मानले जातात.ही परंपरा म्हणजे स्त्रीपेक्षा पुरुष श्रेष्ठ असल्याची जाणीव करुन देणारी आहे. आज कित्येक घटना या परंपरेला आव्हान देणार्‍या ठरत आहेत. स्त्रियांनी मुखाग्नी दिली तर या घटना परंपरेचा विरोध सामाजिक नियमांचे उल्लंघन का मानले जावेत? हा प्रश्‍न प्रत्येक स्त्रिला पडायलाच हवा स्त्री जगताला परंपरेचे वाहक का मानले जाऊ नयेत.
    स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय संपतीत वाढ झाली परंतू वितरण आणि विभाजन न्याय होऊ शकले नाही त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्याची दरी रुंदावत गेली. स्त्रियांना देखील व्यक्तीस्वातंत्र्याचा अतिरेकी हव्यास असलेली संस्कृती दिसते. तर दुसरीकडे मात्र रानावनात काट्याकुट्यात चालत आपल्या कुंटुबासाठी अर्थाजन करणारी स्त्री दिसते. सामाजिक बंधनानी जखडलेली पुरुषप्रधान संस्कृतीत दुय्यम स्थानावर मानन्यात येणारी स्त्री अन्याय, अत्याचार, हिंसाचार यामुळे उमेद हारुण बसलेली अबला दिसते. परंतु याच स्त्रिचे दुसरे रुप म्हणजे जगातील एकुण कामांपैकी दोन तृतीअंश कामे स्त्रियाच करतात. भावी पिढी घडवण्याचे तसेच संस्कार देण्याचे कामही स्त्रियाच करतात. एकुण परिस्थितीचा विचार करता आजही स्त्रियावर होणार्‍या अत्याचाराच्या घटना पाहता ती आजही उपेक्षित असल्याचे चित्र दिसते. महिलांचे प्रश्‍न आणि त्यांच्या समस्या यांना मुळापासून नष्ट करण्याची अवश्यकता आहे. यासाठी महिलांमध्ये जागृती आणायला हवी मुलींना सक्तीचे शिक्षण दिले पाहिजेत. मुलींना व्यावसायीक आणि तांत्रीक शिक्षण देऊन स्वावलंबी बनवायला हवे. स्त्री म्हणजे उपभोगाची किंवा शोभेची वस्तु नाही. प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनीही कृतबगारीचा झेंडा फडकवला आहे. कुराणातील शास्त्रात देखील नमुद केल्याप्रमाणे स्त्री आदिशक्ती आहे. तिची महती, शौर्य, बुद्धी, देवांनी देखील मान्य केली आहे यामुळेच स्त्री शक्तीला अनादिकाळा पासून वंदीताच मानले जाते. त्यामुळेच मला येथे नमुद करावेसे वाटते फक्त एकच दिवस महिलादिनाची आठवण करुन चालणार नाही, फक्त पुरस्कार घेऊनच थांबणार नाही, तर प्रत्येक क्षणाला आपण स्त्री असल्याचा स्वाभिमान बाळगुन स्त्रियांसाठी सतत कार्यशिल असले पाहिजे. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, तसेच इतिहासातील हजारो रणरागीणींना मानाचा मुजरा!
ज्योती जैन
आवृत्ती प्रमुख
  दै. लोकपत्र कार्यालय, नांदेड
 
Top