बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: मयत कर्जदाराच्या शेतजमीनीची बनावट दस्तावेज तयार करुन परस्पर विक्री करुन फसवणूक केल्याप्रकरणी महारुद्र आणि अनिरुध्द विष्णु जाधव यांच्या विरोधात बार्शी पोलिसांत फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महारुद्र यास अटक करण्यात आली आहे.
    यातील भिका नरसु वाणी हे कर्जदार दि.१३ जून २०१३ रोजी मयत झाले आहेत. त्यांच्या पश्‍चात त्यांची पत्नी राजामती, गणेश व दिनेश अशी दोन मुले, चार बहिणी आशा मांजरे, मंदा बारंगुळे, आवडा गोडगे, इंदुरामा चोबे तसेच बसंती, जयप्रकाश, संगीता व सुनिल भराडिया हे इतर हक्कदार आहेत. मयत भिका वाणी यांनी २१ फेब्रुवारी २००५ मध्ये गट नं.१०६७/१ ही शेतजमीन नजरगहाणख करुन ३० हजार रुपये कर्ज घेतले होते. सदरच्या जागेवर कर्ज असतांना दुसरी शेतजमीन गट नं १२६७ याचा बनावट कागदपत्रांच्या आधारे दि.९ ऑक्टोबर २०१३ रोजी लिलाव करुन विक्री केली . दि.१२ नोव्हेंबर २०१३ रोजी २० लाख ४ हजारांना विक्री केली.
    सदरची घटना दि.२४ ऑक्टोबर २०१३ रोजी नवीन ७/१२ उतारा काढल्यावर वाणी यांच्या लक्षात आली. बनावट कागदपत्रे तयार करुन परस्पर विक्री केल्याप्रकरणी महारुद्र व अनिरुद्ध जाधव या दोघाजणांविरुध्द बार्शी पोलिसांत फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला असून एकास अटक करण्यात आली आहे. सदरच्या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पंकज निकम, विश्वास शृंगारे हे करीत आहेत.
 
Top