बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : मुलींनी आपला जोडीदार निवडतांना नोकरीचा आग्रह धरु नये, कोणत्याही क्षेत्रात लाथ मारेल तिथे पाणी काढणारा होतकरु युवक पाहिल्यास आयुष्याला चांगली साथ मिळेल, एखाद्याची घरची परिस्थिती चांगली नसल्यास लोकमंगल समुहाच्या वतीने त्यांचे लग्नदेखील थाटात लावण्यात येईल, असे मत लोकमंगल समुहाचे अध्यक्ष सुभाष (बापू) देशमुख यांनी व्यक्त केले.
    फुले शाहू आंबेडकर विचार प्रतिष्ठान व शिवाजी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला सन्मान मेळाव्यात ते बोलत होते. संत तुकाराम सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर वायुपुत्र नारायण जगदाळे, डॉ.बी.वाय.यादव, डॉ.मधुकर फरताडे, नयना शेख, डॉ.मिनाक्षी पाटील, संदीप अलाट, गोडबोले, व.न.इंगळे, चंद्रकांत मोरे, सचिन वायकुळे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी चंदाताई तिवाडी, डॉ.नसीमा पठाण, भारती रेवडकर, बालिका शिंदे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
    देशमुख बोलताना पुढे म्हणाले, बहुतेक युवकांनी आपले नाव मतदार यादीत लावली आहेत, निवडणुकींचा काळ असल्याने तरुणांनी सावध रहावे, कोणत्याही राजकारण्यांकडून फुकटची मिळाली म्हणून वाईट व्यसनांच्या आहारी जाऊ नये कारण हाच पहिला घोट व्यसनाच्या आहारी जाण्यास व आयुष्याची बरबादी होण्यास कारणीभूत होईल. राष्ट्र घडविण्यासाठी महापुरुषांनी त्याग करत आपले आयुष्य खर्ची घातले आहे. मुलींनी पहिला प्रसंग योग्य रितीने हाताळून टाळावा, आपला मुलगा काय करतो याकडे पालकांचेही लक्ष असावे, फुकटचा पैसा देण्याचे टाळावे व योग्य नियंत्रण ठेवावे. शिक्षणाचा उपयोग घरातील कौशल्यासाठी, ज्ञानाचा उपयोग व्यवहारात करावा. चांगले काम करणारांना सातत्याने चुकीचे काम करतो असे म्हणून नये, आपल्या वागणुकीतून स्त्री पुरुष असमानता दाखवणे चुकीचे आहे. महिला सबलीकरणाऐवजी आता पुरुष सबलीकरणाची गरज आहे. राष्ट्र सबलीकरणासाठी महिलांच्या चांगल्या विचारांची गरज आहे. चिंतन करुन आपले कर्तव्य पार पाडतांना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, आपण मोठे होतांना समाजाकडून काहीतरी घेतले आहे, इतरांनाही चांगले धडे देण्याची गरज आहे. कोणत्याही किरकोळ कारणांसाठी हतबल होऊ नका जिथे कमतरता असेल तिथे लोकमंगल तुमच्या मदतीला धावेल, प्रसंगी पालकत्व घेऊ, लग्नकार्ये, वृक्ष संगोपन इत्यादींच्या माध्यमातून सामाजिक कार्य करु. राष्ट्राने आम्हाला काय दिले असे म्हणतांना अगोदर मी राष्ट्राला काय दिले याचा विचार करावा असेही त्यांनी यावेळी म्हटले.
    डॉ.नसीमा पठाण म्हणाल्या, महिला दिन रोजच आहे. महिला नसल्यावर पुरुषांचे काय होईल. महिलांनी स्वत:चा विचार करावा चुडीदारचा दुपट्टा कुठे गेला? जीन पॅन्ट आणि ब्राऊझरच्या नादाला लागू नये, कपडे कसे घातले, याचबरोबर ज्या स्त्रीवर बलात्कार झाला तो का झाला याचा विचार करा. आरशाची काजळी पुसण्याची गरज आहे, महिला दिनांचे गवगवे करण्यापेक्षा संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न करा. स्वत:चे स्वत:ला जपण्याचा प्रयत्न करा. स्वत:ला ओळखा.
    चंदाताई तिवाडी म्हणाल्या, सून आणि मूलगी त्‍यांची शिकवण तसेच समस्या याचा विचार करावा. मुलीचे लग्न केले म्हणजे सर्व समस्या संपल्या असे होत नाही. लग्नानंतर बहिणीचा हिस्सा वगैरे विचार करण्यास लावणार्‍या गोष्टी आहेत. पती व सासर इत्यादी पुरुषसत्ताक पध्दतींमुळे मुलींना अजूनही माहेरची गरज आहे. बैलपोळ्याप्रमाणे स्त्रीयांचा सण साजरा करण्याची पध्दती होऊ नये. तरुण पिढीला संस्काराचे शिक्षण घरातूनच होते, शैक्षणिक शिक्षण हे अपूरे आहे. मुले-मुली हे आई वडिलांपेक्षा तंत्रज्ञानाच्या जवळ जास्त आहेत. यामुळे खोटे बोलण्याची सवय लागत आहे. व्हॉटसअप सारख्या सोशल मिडीयाचा वापर वाढतांना त्यातून वर्तमानपत्रे इत्यादी चांगल्या वाचनाची सवय लागत नाही उलट सिनेमांतील दृष्यांची छायाचित्रेच जास्त दिसून येतात. त्यामुळे त्यामधील कपड्यांसारखे पोशाख व दागीणे घालण्याची फॅशन सुरु होते अन स्वत:च्या आरोग्याचा विसर पडतो. रोजच्या आहारात सर्व सहा रस आवश्यक आहेत पण कडू कारले कमी होत आहे. समाजातील समस्यांचे चिंतन करण्याची गरज आहे. वासनेच्या आहारी जाणार्‍या तरुण पिढीला समज देण्याची गरज आहे. आईच्या कुशीत व वडिलांच्या ताब्यात बालपण, भावांच्या ताब्यात तरुणपण, पतीच्या ताब्यात वैवाहिक जीवन, यानंतरचे जीवन मुलांच्या ताब्यात अशा अवस्थांतील सुरक्षा कवचात स्त्रीयांची वाढ होते. काही ठिकाणी विडंबन दिसून येते त्यांना चांगला मार्ग दाखविण्याचा प्रयत्न भारुडाच्या माध्यमांतून खारीचा प्रयत्न म्हणून करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.
    यावेळी सचिन वायकुळे, बी.वाय.यादव यांनी विचार मांडले. संदिप अलाट यांनी आभार मानले.
 
Top