शिराढोण -: कळंब तालुक्यातील जवळा खुर्द येथे एका २५ वर्षीय युवतीवर तर खामसवाडी येथील दोन लहान बालिकांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. युवतीवर अत्याचार करणार्‍या ५0 वर्षीय आरोपीस पोलिसांनी अटक केली. तर खामसवाडी प्रकरणातील ६0 वर्षीय वृद्ध फरार झाला आहे.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळा खुर्द येथील एक २५ वर्षीय युवती शुक्रवारी सकाळी घरी एकटीच बसली होती. तिची आई बांगड्या भरण्यासाठी गेली होती. मुलगी घरी एकटी असल्याची संधी साधत गावातीलच मोहन रामभाऊ खळदकर (वय-५0) याने घरात प्रवेश करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. आई घरी आल्यानंतर पीडित मुलीने तिस हकीकत सांगितली. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून खळदकर याच्याविरूद्ध शिराढोण पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
    खामसवाडी येथील एका ४ वर्षीय व ७ वर्षीय बहिणींना चॉकलेट, मुरकूलचे अमिष दाखवून गावातीलच सुधाकर संदीपान शेळके (वय-६0) याने लैंगिक अत्याचार केले. गत काही दिवसांपासून सुरू असलेला हा प्रकार १७ व १९ मार्च रोजी समोर आला. एका मुलीने ही घटना आपल्या आईस सांगितली. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुधाकर शेळके या वृद्धाविरूद्ध शिराढोण पोलिसात शनिवारी गुन्हा नोंद करण्यात आला असून, शेळके फरार आहे. दोन्ही प्रकरणांच तपास सपोनि सूर्यकांत कोकणे हे करीत आहेत.
 
Top