उस्मानाबाद -: मतदान प्रक्रियेत अधिकाधिक मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी आता जिल्हा प्रशासनाने आता गावोगावी असणा-या सुविधा आणि सेतू केंद्रांची मदत घेण्याचे ठरविले आहे. ठिकठिकाणी असणा-या या सेतू केंद्रांमधून नागरिकांना विविध कामांसाठी आवश्यक असणारे दाखले दिले जातात. आता या दाखल्यांसाठी अर्ज केल्यानंतर नागरिकांना मिळणा-या पोचपावतीवर मागील बाजूस मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. मी मतदानाचा हक्क बजावणारच!,असे त्यावर छापण्यात आले आहे. यामुळे अधिकाधिक नागरिकांपर्यंत आता जिल्हा प्रशासनाचे हे आवाहन पोहोचणार आहे.
     भारत निवडणूक आयोगामार्फत स्वीप-2 (सिस्टेमॅटिक व्होटर एज्युकेशन एन्ड इलेक्ट्रोरल पार्टिसिपेशन) हा कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे आणि अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील यांनी अशा प्रकारे सेतू सुविधा केंद्रांचा उपयोग करुन घ्यावयाचे ठरविले. त्यानुसार उस्मनाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्राची व्यवस्था पाहणारे तंत्रज्ञांना सूचना देण्यात आल्या. या सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करत आता नागरिकांना देण्यात येणाऱ्या पोचपावतीवर हे आवाहन छापण्यात आले आहे.
       मतदान प्रत्येक मतदाराचा हक्क आहे, तो त्याने बजावलाच पाहिजे. भारत निवडणूक आयोगही त्यादृष्टीने प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अशा पद्धतीने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. 
     
 
Top