नळदुर्ग -: येथील शिव-बसव-राणा सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्यावतीने दि. 19 ते 22 मार्च या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर महाराज व वीर महाराणा प्रताप या तीन महापुरुषांची जयंती साजरी करण्यात येत आहे. दि. 19 मार्च रोजी शहरातून भव्य मोटारसायकल व रिक्षा रॅली काढून येथील भवानी चौकात या तिन्ही महापुरुषांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली.
रॅलीत भगवे झेंडे लावलेले मोटारसायकल, रिक्षा व टमटम आदी शेकडो वाहने सहभागी झाले होते. यावेळी 'जय भवानी, जय शिवाजी' अशा घोषणांनी शहर दणाणून गेले होते. इंदिरानगरपासून सुरुवात झालेली ही रॅली व्यंकटेशनगर, व्यासनगर, बसस्थानक, शास्त्री चौक, भवानी चौक, राम मंदीर, सावरकर चौक, गवळी गल्ली, मराठा गल्ली, चावकी चौक मार्गे भवानी चौकात आल्यानंतर सदरील रॅलीचे विसर्जन करण्यात आले. यानंतर भवानी चौकात नगराध्यक्ष शहबाज काझी, उपनगराध्यक्षा अर्पणाताई बेडगे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक कमलाकर चव्हाण, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक नितीन कासार, माजी नगरसेवक अमृत पुदाले, सुधीर हजारे, शिवसेनेचे उपतालुकाध्यक्ष सरदारसिंग ठाकूर, युवा सेनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके, भाजपाचे शहराध्यक्ष पद्माकर घोडके, सुशांत भूमकर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर कार्याध्यक्ष महेबुब शेख, कमलाकर डुकरे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर महाराज व वीर महाराणा प्रताप या तीन महापुरुषांच्या प्रतिमांची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष शहबाज काझी यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते या तिन्ही महापुरुषांच्या प्रतिमांची पूजा करण्यात आली. यानंतर शिव-बसव-राणा जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अतुल जगदाळे, उपाध्यक्ष इंद्रजित ठाकूर, सोमनाथ मानशेट्टी, कोषाध्यक्ष दर्शन शेटगार, सागर हजारे यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी प्रा. संतोष पवार यांचे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विनायक अहंकारी यांनी मानले. दि. 22 मार्च रोजी या तिन्ही महापुरुषांच्या प्रतिमांची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.