उमरगा : मुरूम (ता. उमरगा) सज्जाचे तलाठी रामण्णा माळी व खासगी इसम वसंत देडे यांना शेतक-यांकडून सातबारावरील बोजा कमी करण्यासाठी ५०० रूपयांची लाच घेतल्याचे सिद्ध झाल्यावरून उमरगा येथील विशेष न्यायाधिशांनी सक्तमजुरी व दंडाची शिक्षा गुरूवार दि. २०  रोजी ठोठावली.
    मुरूम येथील मल्लीनाथ शरणप्पा कुडवक्कल यांनी मुरूम येथील शेत गट नं. २९२/४ व ४४१/१ या जमिनीवर सन २००९ मध्ये स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा मुरूम या बँकेतुन ऊस पिक कर्ज पन्नास हजार रूपये घेतले होते. सदर कर्जाचा बोजा गट नं. ४४१/१ वर तलाठी सज्जा मुरूम यांनी नोंदविला होता. हे त्यांणनी सप्टेंबर २०१० मध्ये भरले व त्याच वर्षासाठी ऊस पिक कर्ज १,५०,००० रू. बँकेकडे मागणी केली असता बँकेने तलाठी यांना पूर्वीचे ५०,००० रू. बोजा कमी करून नविन कर्ज बोजा दिड लाख रूपये चढवण्यासाठी पत्राने कळविले होते.
    मात्र तलाठी रामण्णा विश्वनाथ माळी यांनी गट नं. ४४१/१ व २२९/४ व दिड लाख रूपये कर्जाची नोंद घेतली. परंतू पूर्वी घेतलेले ५०,०० रू. बोजा गट नं. ४४१/१ वरून कमी केला नाही. ती नोंद कमी करण्यासाठी ५ हजार रूपयाची मागणी मल्लीनाथ कडवक्कल यांना मागणी करून खाजगी इसम वसंत देडे यांना स्विकारण्यास सांगितले. ती रक्कम दि. १४ ऑक्टोंबर २०१० रोजी पंच अंकुश गोटमुकले यांच्या समक्ष वसंत देडे मार्फत स्विकारली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक उपाधिक्षक एस. आर. भांडवले यांनी आरोपीस अटक करून मुरूम पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली व हा खटला उमरगा येथील न्यायालयात दाखल करण्यात आला.
    सुनावणीच्या वेळी सरकार पक्षातर्फे तत्कालिन उपविभागीय अधिकारी सुनिल यादव, फिर्यादी मल्लीनाथ कुडवक्कल, पंच साक्षीदार अंकुश गोटमुकले व पोलिस निरिक्षक एफ. सी. राठोड यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. आरोपींनी ७/१२ वरील बोजा कमी करून ७/१२ देण्याकरीता ५०० रूपये त्यांच्या कार्यालयातील खाजगी इसम वसंत देडे यांच्यामार्फत स्विकारल्याचे सिद्ध झाले ही बाब वसंत देडे यांनी त्याच्या निवेदनात मान्य केले आहे. असा युक्तीवाद अतिरिक्त शासकीय अभियोक्ता व्ही. एस. आळंगे यांनी केला.
    सदरील युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीस विशेष न्यायाधिश स. ला. पठाण यांनी आरोपी क्र. १ तलाठी रामण्णा माळी यास सहा महिने साधी कैद व दोन हजार रूपये दंड व दंड न दिल्यास एक महिना साधी व एक वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रू. दंड व दंड न दिल्यास तीन महिने साधी कैद व आरोपी क्र. २ वसंत देडे यास सहा महिने साधी कैद व दोन हजार रू. दंड व दंड न दिल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सदर प्रकरणात आरोपीतर्फे अ‍ॅड. डी. एस. बारखडे यांनी काम पाहिले.
 
Top