बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: श्री मल्लिकार्जुन हे शिवलिंग बार्शीतील कथले परिवारांनी सुमारे दिडशे वर्षापूर्वी स्थापन केले असून प्रत्येक वर्षी सर्व धार्मिक सण व उत्सव प्रथा परंपरेनुसार पार पाडले जातात. 
   हिंदू नववर्षाच्या सुरुवातीस गुडी पाडव्यादिवशी (चैत्र शु.१) गावातील मुख्य घरापासून विधीवत नंदिध्वजाची (काठी) मिरवणूक काढण्यात येते याकरिता सोलापूरहून गलंगे, मसरे, दर्गोपाटील, मेंगाने आदी मानकरी येतात. सुमारे ३० फूट उंची असलेल्या नंदीध्वजाची सजावट सतीश स्वामी हे करतात. सप्तती दिवशी (चैत्र शु.७) श्री मल्लिकार्जुन (शिव) व ब्रम्हरांबादेवी (पार्वती) यांच्या विवाह सोहळ्यातील हळदीचा कार्यक्रम होतो. अष्टमीला (चैत्र शु.८) हजारो शिवभक्तांच्या साक्षीने विवाहसोहळा पार पाडला जातो. एकादशी (चै.शु.११) दिवशी रथातून श्री मल्लिकार्जुऩाची मिरवणुक काढण्यात येते. यात चांदीच्या श्री मल्लिकार्जुनाचा मुखवटा दर्शनासाठी ठेवण्यात येतो. हा रथ तीन मजली सूंपर्ण लाकडाचा असून यावेळी सूर, सनई, चौघडा इ. मंगल वाद्यांच्या गजरात मिरवणूक निघते. उत्रेश्वर मंदिर, किराणा रोड, कापड बाजार, सोमवार पेठ आदि भागांतून मिरवणूक जात असतांना रथावरुन भाविक भक्त खारीक, खोबरे, साखरेच्या गाठी उधळून दर्शन घेतात. या रथाला ओढण्याचा मान वडार समाजाला असून जाधव, देवकर, चौगुले, पवार आदि समाज बांधव रथाच्या मिरवणूकीत सहभागी होतात. या रथाची निगा राखण्यासाठी प्रत्येक वर्षी तेलपाणी केले जाते. चतुर्दशी (चैत्र शु १४) रोजी श्री मल्लिकार्जुनाचा छबिना काढण्यात येतो. हा छबिना बग्गीच्या चाकांचा असून यात अत्यंत मौल्यवान असलेली लाकडाची सुरेख मल्लिकार्जुनाची मुर्ती आहे, सोबत श्री पार्वती , श्री गणेश व समोर दोन सेवेकरी असून प्रेक्षणीय सोहळा सुरु असतांना भव्य आतषबाजी करण्यात येते. या सोहळ्यास पाहण्याकरिता दूरदूरहून भक्त गण येतात. कथले परिवारांची ५ वी पिढी आजही मोठ्या भक्तीभावाने उस्तव काळात सहभागी होतात. कथले परिवारातील आप्पासाहेब, बाबासाहेब, दादासाहेब , प्रशांत, महेंद्र, मनोज, मयुर, मधुर आदि तन्मयतेने काम करतांना दिसतात. या उत्सवकाळासाठी शशिकांत रे.चंद्रशेखर व प्रमोद श.चंद्रशेखर हे पौरोहित्य करतात. मंदिरात बाबुराव गुरव हे सेवेकरी म्हणून काम करतात. शिव पार्वती कथा किर्तनाचा कार्यक्रम केला जातो. या काळात दररोज रुद्राभिषेक पूजा, प्रवचन, भजन, किर्तन आदि धार्मिक कार्यक्रम पार पाडले जातात.
 
Top