बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत विविध १८ विषयांचे वाचन करण्यात आले. काही विषयांवर सुचना, काहींना विरोध तर काही विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. पीठासनाधिकारी नगराध्यक्ष कादर तांबोळी, प्रभारी मुख्याधिकारी मायकलवार, पाटील यांनी विषयाचे वाचन केले. सभेच्या कामकाजात नेहमीप्रमाणे नागेश अक्कलकोटे उर्फ नागेश आण्णा आणि अशोक बोकेफोर्ड उर्फ आण्णा बोकेफोडे या दोन्ही स्विकृत आण्णांशिवाय कोणत्याही नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत रस घेतला नाही.
    सोमवारी दुपारी कै.भाऊसाहेब झाडबुके सभागृहात ही सभा पार पडली. यावेळी शहरातील विविध ठिकाणी मोबाईल टॉवरच्या उभारणी, कै.आण्णासाहेब बारबोले शॉपींग सेंटरमधील गाळ्यांच्या करारास मुदतवाढ, बेकायदा डिजीटल फलकांना प्रतिबंध करणे, जाहीरात उत्पन्नाचा विचार, भाजी मार्केट गाळ्यांचा लिलाव, पाईपलाईन, गटारी, अंतर्गत भुयारी गटर योजना, सुजल निर्मल अभियानांतर्गत सुधारित योजनेसाठी लोकवर्गणी, निधींची उपलब्धता, न.पा.शिक्षण मंडळ अर्थसंकल्प, रेकॉर्ड स्कॅनिंग निविदा, इलेक्ट्रीक कामे, राजीव आवास योजना प्रकल्प अहवाल, जागा हस्तांतरण, जवाहर हॉस्पिटलकरिता मटेरियल खरेदी, भांडार विभागांना साहित्य पुरविण्यास मुदतवाढ इ. १८ विषष सभेसमोर घेण्यात आले.
    बार्शी शहरातील विविध ठिकाणी लावण्यात येणार्‍या डिजीटलमुळे कायदा सुव्यवस्था व रहदारीस अडथळ्यांचा प्रश्‍न निर्माण होत असल्याने बार्शी पोलिसांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करुऩ धोरणात्मक निर्णय घेण्याची विनंती केली. त्यानुसार खाजगी ठेकेदारांना निवडून देण्यात येणार्‍या जागेत डिजीटल लावण्यास परवानगी देण्यात यावी, यावर विरोधी पक्षाचे नगरसेवक अशोक बोकेफोडे यांनी सदरच्या विषयाला उपविधी केल्याशिवाय अंमलबजावणी करणे चुकीचे असल्याची सूचना मांडली. भुयारी गटार योजनेच्या विषयावर योजना कोणत्या वर्षी कार्यान्वित होणार, नेमके कर्ज किती उचलायचे याचा उल्लेख नसल्याने रिकाम्या जागी किती रक्कम आहे याचा खुलासा करावा असेही यावेळी म्हटले.

 
Top