उस्मानाबाद :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीबाबतची अधिसूचना  बुधवार, दिनांक 19 मार्च रोजी जारी करण्यात येत असल्याची  माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे.
       या अधिसूचनेनुसार उमेदवार किंवा त्यांच्या कोणत्याही सूचकाला नामनिर्देशनपत्रे  निवडणूक निर्णय अधिकारी, उस्मानाबाद किंवा उपविभागीय अधिकारी, उस्मानाबाद तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, उस्मानाबाद यांचेकडे बुधवार, दि. 26 मार्चपर्यंत कोणत्याही दिवशी (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी, 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ यांच्या कार्यालयात दाखल करता येतील, असे कळविण्यात आले आहे.
      नामनिर्देशनपत्रे वर उल्लेख केलेल्या ठिकाणी व वेळी मिळू शकतील. नामनिर्देशनपत्राची छाननी गुरुवार, दि. 27 मार्च रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी, 40- उस्मानाबाद लोकसभा मतदार संघ यांच्या कार्यालयात करण्यात येईल.
     उमेदवारी मागे घेण्याबदलची सूचना उमेदवारांला किंवा उमेदवाराने लेखी प्राधिकार दिलेल्या त्याच्या कोणत्याही सूचकाला किंवा निवडणूक प्रतिनिधीला निवडणूक निर्णय अधिकारी, उस्मानाबाद किंवा उपविभागीय अधिकारी, उस्मानाबाद तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, उस्मानाबाद यांच्या कार्यालयात शनिवार, दि. 29 मार्च रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत देता येईल. निवडणूक लढविली गेल्यास गुरुवार, दि. 17 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल,असे या अधिसूचनेत म्हटले आहे.   
        सदर अधिसूचना लोकसभा मतदार संघातील सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, सर्व तहसीलदार यांच्या कार्यालयातील नोटीस बोर्ड तसेच पंचायत समिती, नगर परिषदा, नगर पालिका, ग्रामपंचायती तसेच गावातील महत्वाच्या आणि सार्वजनिक ठिकाणी 19 मार्च रोजी प्रसिध्द करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.                       
 
Top