उस्मानाबाद :- मतदान प्रक्रियेत अधिकाधिक मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत स्वीप-2 (सिस्टेमॅटिक व्होटर एज्युकेशन एन्ड इलेक्ट्रोरल पार्टिसिपेशन) हा कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून जनजागृती सायकल रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीस प्रारंभ झाला. उस्मानाबाद शहरातील खेळाडू, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या जनजागृती रॅलीत सहभागी झाले होते.
      सकाळी 8 वाजता या रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरापासून झाली. उस्मानाबाद तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार राजेश जाधव यांनी या रॅलीचे नेतृत्व केले. या रॅलीच्या शुभारंभप्रसंगी  अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी तथा स्वीप कक्षाचे समन्वयक अरविंद लाटकर, तहसीलदार सुभाष काकडे, जिल्हा क्रीडा अधिकारी संजीव कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
    जिल्हाधिकारी कार्यालयापासून निघणारी ही रॅली मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, रामनगरमार्गे श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा स्टेडिअम येथे जाउन तेथे तिचा समारोप करण्यात आला.  या रॅलीत खेळाडूंसह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहभागी विद्यार्थी यावेळी मतदान करण्याबाबत जनजागृती करणा-या घोषणा देत होते. मतदान प्रत्येक मतदाराचा हक्क आहे, तो त्याने बजावलाच पाहिजे, मतदान हे आपले कर्तव्य आहे अशा घोषणा हे विद्यार्थी देत होते.
     याशिवाय प्रत्येक तालुका मुख्यालयी उद्या, शनिवार, दि. 8 मार्च रोजी सकाळी 7 वाजता तहसील कार्यालयातून त्याचप्रमाणे शाळास्तरावरही रॅली काढण्यात येणार आहे.  मतदानाविषयी जागृती करणारे फलक या विद्यार्थ्यांच्या हाती असणार आहेत. मतदान माझा हक्क-मी तो बजावणारच, मतदानाचा हक्क-पवित्र हक्क, मतदान करु राष्ट्र उभारु, मतदान करु लोकशाही बळकट करु, मतदान श्रेष्ठदान असे फलक विद्यार्थ्यांच्या हाती असणार आहेत.
     याशिवाय, प्रत्येक तालुक्यातील वरिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या समन्वयाने वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धाही आयोजित करण्यात येणार आहेत.
 
Top