उस्मानाबाद :- ज्या मतदारांची मतदार यादीत नोंद होणे बाकी आहे, त्यांच्यासाठी भारत निवडणूक आयोगाने आणखी एक संधी उपलब्ध करुन दिली आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर रविवार, दि. 9 मार्च रोजी या मतदारांची नावनोंदणी करण्यासाठी विशेष मेळावे आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रभुदय मुळे यांनी दिली आहे.
     भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभाग यांनी वेळोवेळी मतदारनोंदणीबाबत आवाहन केले होते. त्यास मतदारांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, अद्यापही ज्यांचे वय 18 वर्षेपेक्षा जास्त आहे आणि त्यांनी अद्यापही मतदारनोंदणी केली नसेल तर पात्र मतदारांनी या विशेष मेळाव्याचा लाभ घ्यावा. सध्या स्वीप कार्यक्रमांतर्गतमतदार नोंदणी आणि मतदान करण्याबाबत जिल्ह्यात जनजागृती विविध माध्यमातून करण्यात येत आहे. मतदान हा अठरा वर्षे वय पूर्ण असलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांना ही नावनोंदणी करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
      त्या-त्या मतदान केंद्रांवर तेथील बुथ लेवल ऑफीसर अर्थात बीएलओ उपस्थित राहून ही नोंदणी करुन घेणार आहेत. त्या केंद्रावरील मतदार यादीही याठिकाणी पाहण्यासाठी उपलब्ध राहणार असून मतदारांनी नाव यादीत असल्याची खात्री करावी. याशिवाय, अशिक्षित मतदारांना कळावे यासाठी या मतदार यादीचे वाचनही केले जाणार आहे.
       विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य, विविध अशासकीय संस्थांचे प्रमुख यांनीही नागरिकांची तसेच त्यांच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचा-यांची नोंद मतदार यादीत करुन घ्यावी, असे आवाहनही निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
      ज्या मतदारांना ओळखपत्र मिळाले आहेत, त्यांनीही आपले नाव मतदारयादीत असल्याबाबत खात्री करावयाची आहे. ज्या मतदारांची नावे अद्यापही या यादीत नाहीत, त्यांनी या मेळाव्यातच आपली नावे नोंदवायची आहेत.   
 
Top