कळंब
:- तालुक्यामध्ये करण्यात आलेल्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या
कामांची तपासणी करुन बोगस कामे करणार्या अधिकार्यांवर गुन्हे दाखल
करावेत, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमान संघटनेच्या वतीने कळंब तहसील
कार्यालयासमोर ३ मार्चपासून बेमूदत उपोषणास सुरुवात केली होती. कळंब
तालुक्यात मग्रारोहयोंतर्गत करण्यात आलेली कामे ही अंदाजपत्रकानुसार
करण्यात आलेली नाहीत. काही कामे तर केवळ कागदावरच असून, या कामांमध्ये लाखो
रुपयाचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. या कामांच्या चौकशीसाठी तसेच
संबंधितांवर कार्यवाही करावी, या मागणीसाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा
करुनही संबंधितांवर कार्यवाही करण्यात आली नाही. या कामांची गावनिहाय चौकशी
करावी, बोगस कामे करणार्यांवर गुन्हे दाखल करावेत, प्रत्येक
ग्रामपंचायतीसमोर झालेल्या कामांची यादी, त्या कामावर असलेले मजूर व
त्यांना या कामांवर मिळालेल्या मजुरीची यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी
संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान बुधवारी लोकसभा निवडणुकीची
आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर उपोषण आंदोलन करीत अप्पर
जिल्हादंडाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणार्या स्वाभिमान संघटनेच्या
तिघा कार्यकर्त्याविरूध्द कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या
माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता बुधवारी लागू झाली आहे.
अप्पर जिल्हादंडाधिकार्यांनी जमावबंदीचे आदेश लागू केलेले आहेत.
आचारसंहिता लागू असताना व जमावबंदीचे आदेश असतानाही स्वाभिमान संघटनेचे
किरण टेकाळे, प्रकाश भोसले, संजीत हौसलमल व कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी
तहसील कार्यालयासमोर उपोषण आंदोलन केले. याप्रकरणी मंडळ अधिकारी तुकाराम
माधवराव मामले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद
करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि आर.डी.पांचाळे हे करीत आहेत