बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: सन २०१२-१३ मधील रब्बी हंगामातील ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांसाठी ११४४ गावांकरिता रु. २६७६७.८७ लाख रुपयांचे अनुदान बाधीत शेतकर्‍यांसाठी उपलब्ध केले असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.प्रविण गेडाम यांनी काढले आहेत.
    याबाबत कृषि व पदूम विभागाने शासन निर्णय निर्गमीत केले असून सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर मधील ५४ गावांकरिता १०८३.६० लाख रुपये, दक्षिण सोलापूरमधील ९० गावांकरिता २१३२.४८ लाख रुपये, अक्कलकोट तालुक्यातील १३१ गावांकरिता १५२४.७८ लाख, बार्शी तालुक्यातील १३८ गावांकरिता २७२३.५५ लाख, माढा तालुक्यातील ११८ गावांकरिता ३०९३.८१ लाख, मोहोळ तालुक्यातील १०४ गावांकरिता २७२५.८५ लाख, करमाळा तालुक्यातील ११८ गावांकरिता  २७५१.८८ लाख, पंढरपूर तालुक्यातील ९५ गावांकरिता ३२१५.७५ लाख, मंगळवेढा तालुक्यातील ८१ गावांकरिता २०४५.३८ लाख, सांगोला तालुक्यातील १०३ गावांकरिता २७२८.०४ लाख, माळशिरस तालुक्यातील ११२ गावांकरिता २६९३.७५ लाख रुपये अशी एकूण ११ तालुक्यांतील ११४४ गावांतील बाधित शेतकर्‍यांना २६७१८.८७ लाख रुपयांचे अनुदान तहसिलदार यांचेमार्फत संबंधीत शेतकर्‍यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. रब्बी २०१२-१३ हंगामातील दुष्काळामुळे बाधीत गावातील अत्यल्प भूधारक व अल्पभूधारक शेतकर्‍यांना शेती पीकासाठी, अल्पकाळातील फळपिकासाठी व वार्षिक रोवणी पिकासाठी रु.४५००/- प्रतिहेक्टर दराने पेरणी झालेल्या क्षेत्रापुरती मर्यादीत, बहुवार्षिक फळपिकांसाठी रु.१२०००/- प्रतिहेक्टर दराणे पेरणी झालेल्या क्षेत्रापुरती मर्यादीत, तर बहुभूधारक शेतकर्‍यांकरिता दिली जाणारी १ हेक्टर क्षेत्रापुरती मर्यादित मदत देण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
    जिरायत व बागायत पिकांचा विचार न करता रु.४५००/- प्रतिहेक्टर प्रमाणे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना तसेच १ हेक्टर मर्यादेत बहुभूधारक शेतकर्‍यांना रोखीने मदत देण्यात यावी. किमान रु.७५०/- पेरणी क्षेत्रापुरती मर्यादित, बहुवार्षिक फळपिकांसाठी १२०००/- प्रति हेक्टर किमान रु.१५००/- पेरणी क्षेत्रापुरते मर्यादित मदतीचे वाटप करण्यात यावे. निधीचे वाटप रोख स्वरुपात करण्याची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावरील महसूल यंत्रणेमार्फत पार पाडण्यात यावी. त्यासाठी तहसिलदार यांचेमार्फत ०.५ टक्के पर्यंत प्रशासकिय खर्च देय राहिल. ही मदत संबंधीत खातेदारांच्या बँक बचत खात्यांत थेट जमा करण्याच येणार असून यातून कोणत्याही प्रकारची वसूली करता येणार नाही.
 
Top