मुंबई :- चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून मराठी प्रेक्षकांच्‍या मनावर अधिराज्‍य गाजवणारे ज्‍येष्‍ठ मराठी अभिनेते कुलदीप पवार यांचे सोमवारी सायंकाळी अल्‍पशा आजाराने निधन झाले. मृत्‍यूसमयी त्‍यांचे वय 55 वर्ष होते. त्‍यांच्‍या निधनामुळे मराठी चित्रपट व नाट्यसृष्‍टीत शोककळा पसरली आहे.
    प्रकृती अस्‍वास्‍थामुळे शनिवारी रात्री उशिरा कुलदीप पवार यांना अंधेरी येथील कोकीलाबेन रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले होते. गेल्‍या दोन दिवसांपासून त्‍यांच्‍यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. अखेर सोमवारी सायंकाळी उपचारादरम्‍यान त्‍यांची प्राणज्‍योत मालवली. त्‍यांच्‍या पार्थिवावर मंगळवारी कोल्‍हापूर येथे अंत्‍यसंस्‍कार होणार आहेत.
       भारदस्‍त आवाज आणि आकर्षक व्‍यक्तिमत्‍त्‍वाच्‍या जोरावर त्‍यांनी अनेक चित्रपट, नाटक व मालिकांमध्‍ये आपल्‍या भूमिका गाजवल्‍या आहेत. मूळचे कोल्‍हापूरचे असलेल्‍या कुलदीप पवारांनी आपल्‍या अभिनयाच्‍या आवडीपोटी ऐन तारुण्‍यात कोल्‍हापूरचे घर सो्डले हेाते. नटश्रेष्‍ठ प्रभारक पणशीकरांनी त्‍यांना पहिल्‍यांदा इथे ओशाळला मृत्‍यू या नाटकात अभिनयाची संधी दिली. त्‍यात त्‍यांनी संभाजीची भूमिका साकारली आणि रंगभूमी व पडद्यावरही दीर्घकाळ राज्‍य केले.
   'परमवीर' या मालिकेतील त्यांची डिटेक्टीव्हची भूमिका सर्व परिचित आहे. स्टार प्लसवरील 'तू तू मैं मैं' या मालिकेच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांना खूप हसवलं.
     
कुलदीप पवार यांचे गाजलेले चित्रपट :
एकापेक्षा एक, सर्जा, नवरे सगळे गाढव, संसार पाखरांचा, शापित, देवाशपथ, नवरा माझा नवसाचा, जावयाची जात , ढगाला लागली कळ, खरा वारसदार.

प्रसिद्ध नाटके :
अश्रूंची झाली फुले, वीज म्हणाली धरतीला, पाखरू, रखेली, निष्कलंक, पती सगळे उचापती
 
 
Top