सोलापूर :- निवडणूक प्रक्रिया सुरळितपणे पार पडण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा गांभीर्याने अभ्यास करुन अंमलबजावणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले.
    येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लोकसभा निवडणूकीबाबत प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अशोक काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमूख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीपती मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
    यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी सर्व तालुकानिहाय निवडणूकीसाठी उपलब्ध असणारे अधिकारी/ कर्मचारी संख्या, आवश्यक असणारी संख्या याबाबत सविस्तर माहिती घेतली. त्याचप्रमाणे अधिकारी, कर्मचारी यांच्या नेमणूका कराव्यात, आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार त्यांच्या प्रशिक्षणांसाठीच्या तारखा निश्चित करुन प्रशिक्षण देण्याचे निर्देश दिले.
    तसेच निवडणूक कालावधीसाठीच्या भरारी पथकाच्या टीमची स्थापना करावी, मतदार यादी व सर्व मतदान केंद्राची जबाबदार अधिका-यामार्फत तपासणी करावी, जुनी मतदान केंद्राची इमारत पडली असल्यास अथवा वापरा योग्य नसल्यास मतदान केंद्रात बदल करावयाचा असल्यास आवश्यक कारणास्तव त्वरित प्रस्ताव सादर करावा. त्यानुसार बदलांसाठी निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठवुन मंजूरी घेता येईल. निवडणूकीसाठी येणारे निरीक्षकांसाठी संपर्क अधिकारी, स्टेनो आदी कर्मचारी वाहन व्यवस्था, ब्रॉडबॅण्ड सुविधा, जास्तीचे दूरध्वनी सुविधा बाबत आवश्यक तयारी पूर्ण करावी. शासकीय वाहनाची उपलब्धता पाहून आवश्यकतेनुसार चांगली खाजगी वाहने घ्यावीत
    मतदान केंद्रात अखंडित वीजपुरवठा राहावा, पिण्याचे पाणी बाहेरुन येणा-या अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी निवास व आवश्यकतेनुसार सुविधा उपलब्ध कराव्यात. ज्येष्ठ नागरिकांसाठीही आयोगाच्या सूचनेनुसार मतदान केंद्रात सुविधा उपलब्ध कराव्यात. तालुकास्तरावर आचारसंहिता कक्ष, प्रत्येक खर्चाची नोंद कशी घ्यावी, मतदारांमध्ये मतदानासाठी जागृती करणे आदी निवडणूक प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन सूचनांद्वारे सविस्तर मार्गदर्शन डॉ. गेडाम यांनी केले.
    यावेळी देण्यात आलेल्या सूचनांचे सर्वांनी गांर्भीर्याने अंमलबजावणी करावी. याबाबत तालुकास्तरावर भेट देवून याबाबत केलेली कार्यवाहीची प्रत्यक्ष माहिती घेणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांनी केले. तसेच निवडणूकीबाबत उपस्थित अधिका-यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
    याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीपती मोरे म्हणाले की, निवडणूकीबाबतच्या सर्व प्रक्रियेची माहिती आयोगास Online पाहता येणार आहे. याबाबत नागरिकांच्या Online तक्रारी प्राप्त होत आहेत. त्याचे निराकरण संबंधित अधिका-यांनी वेळीच करावे, ' इलेक्शन मॉनिटरिंग डॅशबोर्ड ' द्वारे निवडणूकीची सर्व माहिती निवडणूक आयोगाला Live पाहता येणार आहे. यामध्ये निवडणूक अधिका-यांची माहिती, मतदार यादी, मतदान केंद्रे आदी पाठविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
    या प्रशिक्षणास सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी, निवडणूक नायब तहसीलदार आदी उपस्थित होते.
 
Top