उस्मानाबाद :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दोन सदस्यीय केंद्रीय पथकाने आज जिल्ह्याचा दौरा केला. नवी दिल्ली येथील अर्थ मंत्रालयातील सहसंचालक दीनानाथ आणि नागपूर येथील सीआयसीआरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ एस.एम. पालवे यांनी विविध गावांना भेटी घेऊन परिस्थितीची पाहणी केली.
      जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, कृषी विभागाचे लातूर विभागाचे सहसंचालक अशोक किरनळ्ळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, कृषी विकास अधिकारी मदनलाल मिनीयार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस.एस. भोसले यांच्यासह विविध अधिकारी यावेळी त्यांच्यासोबत होते.
      सकाळी ठीक 9-30 वाजता लातूरहून हे पथक ढोराळा (ता. कळंब) येथे दाखल झाले. त्यांनी ढोराळा येथील शेतकरी भारत नाईकनवरे यांच्या शेतास भेट देऊन गारपीटीने नुकसान  झालेल्या द्राक्षपीकाची पाहणी केली. त्याचबरोबर त्या शिवारातील ज्वारी पीकाचेही या गारपीटीने प्रचंड नुकसान झाले होते. त्याचीही अतिशय आस्थेवाईकपणे पथकातील सदस्यांनी माहिती घेतली. त्यानंतर या पथकाने उस्मानाबाद तालुक्यातील पळसप आणि आरणी येथे भेटी दिल्या. त्याठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा त्यांच्या कानी घातल्या. विशेष म्हणजे या पथकाने शेतात जाऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. कृषी अधिकाऱ्यांकडून त्या-त्या भागातील पीकपरिस्थिती, प्रमुख पीके आदींची माहिती घेतली.
      तेथून हे पथक तुळजापूरकडे रवाना झाले. तुळजापूर तालुक्यातील भातंब्री येथे त्यांनी भेट दिली. त्याठिकाणी गारपीटीने घरांचे तसेच शेतपीकांचे नुकसान मोठे नुकसान झाले आहे. ती व्यथा स्थानिक नागरिकांनी त्यांच्या कानी घातली.  सर्वांचे त्यांनी  ऐकून घेतले. कृषी अधिकाऱ्यांनीही त्यांना जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची माहिती दिली. तेथून हे पथक बीडकडे रवाना झाले.
 
Top