बाळकृष्‍ण तांबारे
कळंब -: उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्‍या वेतनासाठी शिक्षण संचालक पुणे यांच्‍याकडून अपुरी आर्थिक तरतुद झाल्‍याने जिल्‍ह्यातील शिक्षकांचे फेब्रुवारी महिन्‍याचे वेतन करण्‍यास विलंब होत असून वेतनासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी महाराष्‍ट्र राज्‍य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेश कार्याध्‍यक्ष बाळकृष्‍ण तांबारे यांनी दिली. 
     राज्‍यातील शिक्षकांच्‍या वेतनासाठी प्रत्‍येक महिन्‍यास शिक्षण संचालक पुणे येथून आर्थिक तरतूद केली जाते. फेब्रुवारी महिन्‍याच्‍या वेतनासाठी 17 कोटी रुपयाची आवश्‍यकता असून महागाई भत्‍त्‍याच्‍या फरकासाठी 2.50 कोटीची आवश्‍यकता आहे. सध्‍या जिल्‍हा परिषदेकडे 12 कोटी रुपये उपलब्‍ध असून फेब्रुवारी महिन्‍याच्‍या वेतनासाठी आणखी 7.50 कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे. तसेच सहाव्‍या वेतन आयोगातील फरकासाठी 25 कोटी रुपयाची गरज असून फेब्रुवारी महिन्‍याच्‍या वेतनासाठी व सहावा वेतन आयोगातील फरकासाठी 33कोटी रुपयाची त्‍वरीत आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी महाराष्‍ट्र राज्‍य प्राथमिक शिक्षक संघाच्‍या शिष्‍टमंडळाने शिक्षण संचालक महावीर माने व शिक्षक सहसंचालक गोविंद नांदेडे यांना दि. 14 मार्च रोजी प्रत्‍यक्ष भेटून केली आहे. या शिष्‍टमंडळात शिक्षक नेते संभाजीराव थोरात, मार्गदर्शक प्रा. एस.डी. पाटील, अध्‍यक्ष राजाराम वरुटे, कार्याध्‍यक्ष बाळकृष्‍ण तांबारे, कोषाध्‍यक्ष अंबादास वाजे, सल्‍लागार विनोद राऊत हे पदाधिकारी सहभागी होते.
        यावेळी दि. 20 मार्चपूर्वी पुरेशी आर्थिक तरतूद केली जाईल, असे आश्‍वासन संचालक महावीर माने व गोविंद नांदेडे यांनी केले असल्‍याचे तांबारे यांनी पत्रकात म्‍हटले आहे. 
         
 
Top