कळंब -: अतिशय वर्दळीच्या सोलापूर - धुळे  राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ वरील तेरखेडा ते पारगाव दरम्यान काही ठिकाणी रस्त्यावरच मोठ-मोठे खड्डे तर काही ठिकाणी रस्त्याची अवस्था चाळणीसारखी झाली आहे. या जीवघेण्या खड्डय़ांमुळे वाहन चालकासह प्रवाशातून संताप व्यक्त होत असून, सदर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.
     सोलापूर ते धुळे जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग असून हेवी वेट वाहनांची वर्दळ सतत असते, गेल्या अनेक दिवसापासून हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे, सदर खड्डे आणि खराब रस्त्याचा फायदा चोरांना होतो आहे, तेरखेडा ते सरमकुंडी फाटा या दरम्यान मोठ्या प्रमाणात चोऱ्या होतात, एक महिन्यापूर्वी सुमारे पन्नास लाख रुपये किमतीची टायर असलेली एक मालट्रक चालकासह दरोडेखोरांनी लंपास केली होती, तसेच वेगवेगळी वाहनेही लुटली जातात या  रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे त्यामुळे वाहन चालकांला जीव मुठीत घेवूनच प्रवास करावा लागत आहे.
     भरधाव वेगाने वाहन चालविणारे वाहनचालक खड्डा चुकविण्याच्या नादात राँगसाईडचा वापर करीत आहेत. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहन चालकांचा जीव धोक्यात आला असून सतत प्रवास करणारे वाहन चालक तसेच प्रवाशांना पाठदुखी, मानदुखीसारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे लवकरच या महामार्गाचे चौपदरीकरण होणार आहे त्याचा सर्व्हे हि झालाय  चौपदरीकरणाची वाट पाहणार्‍या सार्वजनिक बांधकाम विभागाने संपूर्ण रस्ता होईल तेव्हा होईल परंतु किमान डांबर टाकून खड्डे तरी बुजवावे, अशी प्रवाशांतून मागणी केली जात आहे.
 
Top