उस्मानाबाद -: लोकसभा निवडणूकीसाठी नेमून दिलेली जबाबदारी पार पाडण्यासंदर्भात सर्व क्षेत्रीय अधिका-यांचे प्रशिक्षण मंगळवारी येथील जिल्हा परिषद सभागृहात पार पाडले. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी उपस्थितांना निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करुन निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी जबाबदारीचे भान ठेवावे, अशा सूचना दिल्या.
    निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उप जिल्हा निवडणूक  अधिकारी प्रभोदय मुळे, अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण कक्षप्रमुख तथा उपविभागीय अधिकारी, कळंब सचिन बारवकर, मदत व तक्रार  निवारण कक्ष प्रमुख बी.एस. चाकूरकर, स्वीप कक्षाचे प्रमुख अरविंद लाटकर यांची यावेळी उपस्थिती होती.
      या क्षेत्रीय अधिका-यांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची संपूर्ण माहिती व प्रशिक्षण, निवडणूक व्यवस्थापन, निवडणूक प्रक्रिया, आदर्श आचारसंहिता आणि निवडणूकीच्या अनुषंगाने यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
    निवडणूकीसाठी नियुक्त केलेल्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्यांचे निवडणूक अधिकारी  कार्यालयाने दिलेले ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक आहे. त्याने त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व मतदान केंद्राची यादी बुथनिहाय जवळ बाळगणे आवश्यक आहे. याशिवाय, त्या-त्या क्षेत्रासाठीचा संपर्क समन्वय आराखडा त्यांनी तयार केला असला पाहिजे. कोणत्याही प्रकारे निवडणूक विषयक कामात हयगय होता कामा नये, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
    याशिवाय, संबंधितांना त्या-त्या क्षेत्राचा अद्यावत नकाशा उपलब्ध करुन दिला जाणार आहे. यंदाच्या निवडणूक प्रक्रियेसाठी जवळपास 8 हजार 675 अधिकारी –कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ही यंत्रणा निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी कार्यरत झाली असून त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येत आहे.
    जिल्ह्यात एकूण 1971 मतदान केंद्रे आहेत. त्यात औसा-303, उमरगा-301, तुळजापूर-370, उस्मानाबाद-345, परंडा-343 आणि बार्शी-309 अशी विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्राची संख्या आहे.
 
Top