जळकोट (संजय रेणुके) :- महाराष्‍ट्र राज्‍य वीज वितरण कंपनीच्‍या अनागोंदी व गलथान कारभाराच्‍या कथा रोज वेगवेगळ्या स्‍वरुपात ग्राहकांना पहावयास मिळत आहे. त्‍याचाच आणखी एक नमुना तुळजाूपर तालुक्‍यासह जळकोटवासियांना पहावयास व अनुभवास आला आहे. त्‍यामुळे जळकोटस तुळजापूर तालुक्‍यातील ग्राहकांमध्‍ये महाराष्‍ट्र राज्‍य वीज वितरण कंपनीच्‍या गलथान कारभाराविषयी तीव्र संताप व्‍यक्‍त होत असून कार्यालयात बसूनच वीज बिले बनवणा-या संबंधित गुत्‍तेदारासह अधिका-यांवर तात्‍काळ योग्‍य ती कारवाई व्‍हावी अन्‍यथा एकही गा्रहक एक रुपयाही वीज बिल भरणार नाही, असा आक्रमक पवित्रा जळकोटवासियांनी घेतला आहे. 
         महाराष्‍ट्र राज्‍य वीज वितरण कंपनीकडून घरगुती, औद्योगिक, छोटे व्‍यावसायिक व शेतीसाठीच्‍या वापरासाठीचे वीज बिले वीज वितरण कंपनीकडून प्रत्‍यक्ष ग्राहकांच्‍या घरी जाऊन वीज वापराचे रिडींग घेऊन बीले देण्‍याऐवजी संबंधित बिले बनवणा-या ग्राहकांकडून कार्यालयात बसून संगणकीय जुन्‍या नोंदीनुसार बिले बनवत असल्‍याने ग्राहकांना त्‍यांच्‍या वापराच्‍या युनिटपेक्षा पाचपट-दहापट युनिट वापर दाखवून अव्‍वाच्‍या सव्‍वा रक्‍कमेची बीले माथी मारली जात आहेत. सदर बिल बीलात दर्शविलेल्‍या तारखेस नाही भरल्‍यास संबंधित ग्राहकास कसलीही सूचना अथवा कायदेशीर तीन नोटिसा न देताच वीजपुरवठा खंडित करुन सर्व्हिस वायर व मीटर काढून जप्‍त करण्‍यात येत आहे. सदरचे वीज बिल चुकीचे असून ते दुरुस्‍त करुन द्यावे, अशी रितसर तक्रार वरिष्‍ठांकडे करण्‍यास गेले असता आलेल्‍या बिलांपैकी पन्‍नास टक्‍के बील तात्‍काळ भरा, तरच त्‍याची दुरुस्‍ती करुन मिळेल, अशी उद्दामपणाची व हुकूमशाहाची भाषा संबंधित कर्मचा-यासह वरिष्‍ठ अधिका-यांकडून ग्राहकांना वापरली जाते.
          वीज वितरण कंपनीचे कार्यालयात बसून बीले देण्‍याचे, सरासरी बिले देणे, सहा महिने व वर्षातून एकदाच बिले देणे, सहा महिन्‍यांपेक्षा जास्‍त कालावधीची थकबाकी नियमानुसार वसुल करण्‍याचा अधिकारी नसतानाही ग्राहकांच्‍या अज्ञानपणाचा गैर फायदा घेऊन वर्षापेक्षा जास्‍त कालावधीची बीले भरमसाठ आकारनु ग्राहकांना मानसिक 'शॉक' देण्‍याचे  पराक्रमी काम केले जात आहे. त्‍याचाच एक उत्‍तम नमुना वीज वितरण कंपनीच्‍या तुळजापूर प्रादेशिक कार्यालयाकडून जळकोटसह तालुक्‍यातील ग्राहकांना अनुभवास मिळाला आहे. तुळजापूर तालुक्‍यातील जळकोट येथील ग्राहकांना गेल्‍या महिन्‍याच्‍या कालावधीच्‍या बिलामध्‍ये सर्वच ग्राहकांना सरासरी 134 युनिटचेच बील आकारण करण्‍याचा पराक्रम कार्यालयात बसून संबंधित गुत्‍तेदाराने केला आहे. त्‍याची रक्‍कम मात्र किमान 660 रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंत बील आकारणी करण्‍यात आली असल्‍याने सामान्‍य वीज वापर करणा-या ग्राहकांचे डोळे पांढरे झाले आहेत. सदर बील भरण्‍याची अंतिम तारीख दि. 28 मार्च 2014 असून त्‍या तारखेपर्यंत बीले नाही भरल्‍यास वीज पुरवठा खंडित करुन सर्व्हिस वायर व मीटर जप्‍त करण्‍याची कारवाई केली जाणार आहे. आर्थिक वर्ष मार्च अखेरीस असल्‍याने जास्‍तीत जास्‍त वसुलीचा तगादा वरिष्‍ठांकडून होत असल्‍याने साम, दाम, दंड या उक्‍तीप्रमाणे महावितरणकडून चुकीचे बीले देवून कारवाई केली जात आहे. त्‍यामुळे सरासरी आलेली बीले जळकोट येथील ग्रामपंचायत कार्यालयात संबंधित कनिष्‍ठ अभियंता व स्‍थानिक कर्मचारी 134 युनिटपैकी केवळ 34 युनिटचे बील 250 रुपये आकारुन दुरुस्‍त करुन दिले जात आहे. त्‍यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात बीले दुरुस्‍त करुन घेण्‍यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे.
    या संदर्भात कनिष्‍ठ अभियंता साळुंके यांना विचारले असता, संपूर्ण तालुक्‍यातच असा गैर कारभार झाला असल्‍याचे सांगून झालेल्‍या ग्राहकांच्‍या त्रासाची तक्रार वरिष्‍ठांच्‍या कानावर घातली असून संबंधित वीज बीले बनवणा-या गुत्‍तेदारावर योग्‍य ती कारवाई वरिष्‍ठ स्‍तरावरुन होईल, असे आश्‍वासन त्‍यांनी दिले.
     उपरोक्‍त गैरप्रकार जर तात्‍काळ बंद नाही झाला तर जळकोटचा एकही ग्राहक एक रुपयाही बील भरणार नाही, असा निर्वाणीचा इशारा ग्राहकांतून देण्‍यात आला आहे.  
 
Top