पांगरी (गणेश गोडसे) :- तांदुळवाडी (ता. बार्शी) शिवारात असलेल्या सुरज फायर वर्क्स या परवानाधारक फटाके कारखान्यास  अचानक आग लागुन झालेल्या स्फोटात फटाके निर्मितीसाठी लागणा़-या कच्च्या साहित्यासह कामगार वर्गांच्या तीन दुचाकी व इतर चारचाकी वाहने आगीच्या पक्षस्थानी पडुन बारा लाखांच्याही पुढे नुकसान झाल्याची घटना आज बुधवार रोजी सकाळी 11 वाजण्‍याच्या सुमारास घडली. सुदैवाने घटनास्थळावरील परिस्थतीचा अंदाज घेऊन कामगार व शेतमालकांनी तेथुन पोबारा केल्यामुळे जिवित हानी टळली.

    स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की तो परिसरातील दहा ते बारा कि.मी. अंतरावरील गावांतील नागरीकांना ऐकण्‍यास मिळाला. बार्शी येथुन आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्‍याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत घटनास्ळावरील सर्व साहित्या आगीच्या विळख्यात आले होते. दुचाकी क्रमांक एम.एच.12 सी.एस.9770, एम.एच.13 बी 4776 व टमटम क्रमांक एम एच.14 ए.झेड 2413 आदी आगीत जळुन खाक झालेल्या वाहने आहेत. पांगरी पोलिस ठाण्याचे स.पो.नि. बी.डी.होवाळ, पोलिस उपनिरीक्षक राजु राठोड, दादाराव लोंढे, रविंद्र भडुरे यांच्यासह अनेकांनी भेटी देऊन पहानी केली.
    बार्शी-उस्मानाबाद रस्त्यावर तांदुळवाडी शिवारात कृष्णाथ तुकाराम गरड यांच्या मालकीच्या शेती गट नंबर 274 मध्ये अतुल गरड यांच्या मालकीचा सुरज फायर वर्क्स हा शोभेच्या दारूचे साहित्य बनवणारा कारखाना असुन दररोज चार पुरूष व आठ महिला असे बारा कामगार कारखाण्‍यात साहित्य बनवण्‍याचे काम करतात. आज बुधवारी सकाळी कारखान्यातील कच्चे साहित्य असलेल्या खोलीत अचानक स्फोटाचा आवाज आला. आवाज येताच परिस्थतीचे गांभिर्य लक्षात घेत घटनास्थळावरील कृष्णाथ तुकाराम गरड व निलावती कृष्णाथ गरड या पती-पत्नींसह इतरांनी तेथुन काढता पाय घेत सुरक्षित स्थळ गाठले. त्यामुळे सर्वांचे प्राण वाचले. एकापाठोपाठ तीनही खोल्या व त्यावरील पत्रे भिंती दहा-पंधरा विटांचे गठठे व इतर साहित्य आकाशात दुरवर उडुन चारशे ते पाचशे फुटांपर्यंत जावुन पडले. सुदैवाने कामगार पळत असलेल्या दिशेने काहीही फेकले गेले नाही. स्फोटात कामगारांनी निवडणुकींचा कालावधी असल्यामुळे तयार करून ठेवलेल्या रंगीबेरंगी आदल्या, शॉट यासह इतर साहित्य जळुन आगीच्या भक्ष्स्थानी पडले. कारखान्यात नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण समजु शकले नाही. पांगरी पोलिसात फटाके कारखाना जळित प्रकरणी गुन्हा दाखल करण्‍याचे काम सुरू आहे.
 
Top