उस्मानाबाद :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आता प्रशासकीय यंत्रणा गतीमान झाली असून निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. त्यामुळे आचारसंहितेचा तसेच निवडणूकविषयक नियमांचा कोठेही भंग होणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी आता उमेदवार आणि राजकीय पक्षांवर राहणार आहे. उमेदवार अथवा राजकीय पक्ष करणार असलेल्या खर्चावरही निवडणूक प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला आता स्वतंत्र नवे बॅंक खाते उघडावे लागणार आहे. त्याचा वापर केवळ निवडणूक खर्चासाठीच करता येणार आहे.
       निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चाबाबत जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांची माहिती कोषागार अधिकारी तथा जिल्हास्तरीय खर्च संनियंत्रण कक्षाचे प्रमुख राहूल कदम यांनी दिली.  प्रत्येक उमेदवारांने आपला बॅंक खाते क्रमांक, बॅंकेचे नाव निवडणूक अर्ज भरताना लेखी स्वरुपात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक राहणार आहे. उमेदवारांनी या खात्यात स्वताच्या रकमेसह पक्षाकडून आलेल्या रकमा जमा कराव्यात आणि याच खात्यातून खर्च करणे बंधनकारक राहणार आहे. खर्चाचे अंतीम विवरणपत्र सादर करताना बॅंकखात्याचे प्रमाणित विवरणपत्र जोडावे लागणार आहे.
       बॅंक खाते उमेदवाराच्या स्वताच्या नावे किंवा उमेदवार आणि त्यांचा राजकीय प्रतिनिधी यांच्या संयुक्त नावे उघडता येईल. परंतू कोणत्याही प्रकारे कुटूंबातील सदस् राजकीय प्रतिनिधी नसतील तर त्यांच्यासह खाते उघडता येणार नाही, असे श्री. कदम यांनी नमूद केले असून उमेदवारांनी अनामत रक्कम वगळता सर्व खर्च अकाउंट पेयी धनादेशाद्वारेच करावयाचा आहे. हे धनादेश निवडणुकीसाठी उघडलेल्या खात्यावरच खर्ची टाकावयाचे आहेत.  उमेदवार जास्तीत जास्त वीस हजार रुपयांपर्यंतचा व्यवहार  रोख रकमेत करु शकणार आहेत. प्रत्येक उमेदवारांनी अतिरिक्त खर्च प्रतिनिधीची नेमणूक करावी आणि त्याचा तपशील खर्चविषयक कक्षास कळवावा, असे आवाहन कदम यांनी केले आहे. प्रत्येक उमेदवारांनी त्यांच्या प्रतिनिधींमार्फत लेखे तपासणीसाठी उपलब्ध करुन देणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
    उमेदवारांच्या बॅंक खात्यातून होणा-या व्यवहारांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी बॅंकांवरही राहणार आहे. जिल्ह्यातील कोणत्याही खातेधारकाचा अथवा अन्य व्यक्तींचा संशयास्पद व्यवहारांचा तपशील दररोज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळविणे बॅंकांना बंधनकारक राहणार आहे. निवडणूक कालावधीत कोणत्याही खात्यावर  10 लाखांपेक्षा जास्त रकमेचा व्यवहार झाल्यास त्याची माहिती कळविण्याचे बंधनही बॅंकाना राहणार आहे. निवडणुक कालावधीत बॅंकांनी उमेदवारांच्या खात्यावरील व्यवहार पार पाडण्यासाठी स्वतंत्र खिडक्यांची स्थापना करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
 
Top