बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : काटी सावरगाव येथे भाऊसाहेब आंधळकर यांच्या मार्गदर्शनाखाली टेंपलरोज कंपनीच्या खाजगी तत्वावरील रामगिरी सहकारी साखर कारखान्याच्या कामाची जय्यत तयारी झाली आहे.
सर्व आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता व मशीनरींची चाचणी करुन १ जानेवारी २०१५ पर्यंत कारखाना सुरु होणार असल्याची माहिती शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी पत्रकारांना दिली.
    यावेळी शिवसेना शहराध्यक्ष दिपकभैया आंधळकर, नागजीभाऊ नान्नजकर, वैराग विभागाचे संतोष गणेचारी, पांडूरंग घाटे, पवार, राम जगताप आदी उपस्थित होते. या कारखान्याचे चेअरमन डॉ.ज्योती आंधळकर-सावंत, तज्ञ संचालक देविदास सजसनानी हे असून कारखान्याच्या उभारणीचे काम बर्‍यापैकी झाल्यानंतरच याच्या भाग भांडवलाचे शेअर्स देण्याचा प्रारंभ होणार आहे.
     वैराग पासून जवळच्या अंतरावर असलेल्या या कारखान्याची ५ हजार मेट्रीक टन गाळप क्षमता, २१ मेगावॅट कोजनरेशन विद्युत प्रकल्प, ४५ हजार लिटर डिस्टीलरी प्रकल्प आदी ३१७ कोटींचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. कारखान्यासाठी असलेल्या ९२ एकर क्षेत्रातील ६७ एकर क्षेत्राचा बांधकाम क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. बिनशेती, विद्युत कनेक्शन, प्रदुषण, बांधकाम परवाना आदी पूर्तता करुन बांधकामाच्या पाया तपासणीचे काम सुरु करुन यंत्रसामुग्री उभे करण्याचा ठेका बारामती येथील हायटेक या कंपनीला देण्यात आला आहे. भोगावती तथा संतनाथ साखर कारखान्याचा भोंगा बंद झाल्यानंतर शेतकर्‍यांच्या उसाचा ज्वलंत प्रश्‍न निर्माण झाल्यानंतर बार्शी तालुक्यात अनेक ठिकाणी खाजगी तत्वावरील साखर कारखाने सुरु होऊ लागले. भाऊसाहेब आंधळकर यांनी शिवसेनेचे काम सुरु केल्याने शेतकर्‍यांच्या उसाचा प्रश्‍न अथवा त्यांची अडचण होऊ नये याकरिता खाजगी साखर कारखाना सुरु करण्याचा निर्णय घेतला. कारखाना सुरु होण्यासाठी लागणार्‍या तांत्रीक बाबींची पुर्तता करतांना राजकिय कुरघोड्यांतून आंधळकर यांना अत्यंत त्रास देण्यास राजकिय विरोधकांनी सुरु केले तरीदेखिल कोणत्याही परिस्थितीत साखर कारखाना सुरुच करणार असा शेतकर्‍यांच्या हितासाठी हट्ट करुन सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली आहे.

संतनाथ काराखानाही सुरु करणार !
    वैराग येथील सहकारी तत्वावरील असलेल्या संतनाथ साखर कारखाना चालविण्यासाठी निघालेले टेंडरदेखिल आपल्या सहकारी टेंपलरोज कंपनीने पुन्हा एकदा भरले असून त्याकरिता ७ कोटी ९० लाखांच्या पुढील बोली लावण्याची अट होती. त्यासाठी सहकारी एकमेव कंपनीने मागणी केली आहे. यासाठी महाराष्ट राज्य सहकारी बँकेने ५ मार्चपर्यंत ५ कोटी २७ लाख रुपये भरण्याची मागणीकेली आहे. त्यानुसार आम्ही ३१ मे पर्यंत रक्कम भरणा करु अशी लेखी मागणी केली आहे. १६ हजार शेतकर्‍यांचा उसाचा प्रश्‍न ४५० कामगारांचा रोजीरोटीचा प्रश्‍न या कारखान्यावर अवलंबून आहे. या कारखान्यासाठी शेतकरी संघटना, कामगार यांचा पाठींबा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.
 
Top