उस्मानाबाद -: नागरिकांमध्ये मतदानाबद्दल जनजागृती वाढावी यासाठी उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने अभिनव उपक्रम राबविला. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि जिल्हा पोलीस दल आणि सर्व शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने मतदार जनजागृतीसाठी मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले. पोलीस मुख्यालयाच्या भव्य पटांगणावर हजारो विद्यार्थी, अधिकारी-कर्मचारी, शिक्षकवर्ग यांनी मानवी साखळी करुन मतदान करण्याबाबतचा संकल्प करण्याविषयी जागृती केली. मतदानाबद्द्ल जागरुकता करणारी भव्य रांगोळी हे या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले.
     जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील, अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांच्यासह विविध विभागांच्या अधिका-यांच्या उपस्थितीत सर्वांनी मतदान करण्याविषयीच्या संकल्प पत्राचे वाचन केले. यावेळी मतदानाबद्दल जागरुकता करणा-या घोषणांनी दणाणून सोडला. उस्मानाबाद शहरात मतदार जागृतीसाठी अशा प्रकारचा अभिनव उपक्रम प्रथमच राबविण्यात आल्याने उस्मानाबादकर नागरिकांनाही त्याबद्दल उत्सुकता होती. त्यामुळे ही मानवी साखळी पाहण्यासाठी नागरिकांनीही गर्दी केली होती.
     पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, संस्कार भारतीचे कलाकार यांनी तब्बल 20 तास ताबून मतदार जागृती करणारी ही रांगोळी रेखाटली. या रांगोळीच्या भोवताली सर्व विद्यार्थी, शासकीय यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी यांनी मानवी साखळी तयार केली. मतदान प्रत्येकाचा हक्क आहे. तो प्रत्येकाने बजावला पाहिजे. निर्भिडपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. मतदान प्रक्रियेत अधिकाधिक मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत स्वीप-2 (सिस्टेमॅटिक व्होटर एज्युकेशन एन्ड इलेक्ट्रोरल पार्टिसिपेशन) हा कार्यक्रम राबविला जात आहे. त्यामुळे विविध माध्यमांद्वारे मतदानाचे महत्व पटवून देऊन आणि मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे याची जाणीव करुन देण्यासाठी जिल्ह्यात जनजागृती करण्यात येत आहे.
      आज आयोजित केलेल्या मानवी साखळीच्या माध्यमातून या मतदार जनजागृतीच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले गेले. ज्या-ज्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचून जनजागृती करण्यात येईल, त्या माध्यमांचा उपयोग करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
       विविध विभागांबरोबरच जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, निर्मल भारत अभियान कक्ष यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्याबरोबरच आजच्या या मानवी साखळी आयोजनात निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रभुदय मुळे, स्वीप कार्यक्रमाचे समन्वयक अरविंद लाटकर, अपर पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत हजारे, कोषागार अधिकारी राहूल कदम, शिक्षणाधिकारी वैजिनाथ खांडके व त्यांचे सर्व सहकारी यांच्यासह विविध विभागप्रमुखांनी महत्वाची भूमिका बजावली.

 
Top