कळंब -: अवकाळी पाऊस व गारपिठीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांच्या मदतीसाठी राज्यातील शिक्षक एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री निधीला देणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
राज्यात फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिठ झाल्यामुळै शेतक-यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. या गारपिठीमुळे अनेक कुटुंबे उध्दवस्त झाले असून शेतकरी व ग्रामीण जनता त्रस्त झाली आहे. अनेक ठिकाणी जिवित हानी झाली असून या नुकसान झालेल्या कुटुंबाना मदत करता यावी, यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने दि. 14 मार्च रोजी पुणे येथे झालेल्या बैठकीत एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीस शिक्षक नेते संभाजीराव थोरात, मार्गदर्शक एस.डी. पाटील, अध्यक्ष राजराम वरुटे, कार्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, कोषाध्यक्ष अंबादास वाजे, सल्लागार विनोद राऊत आदीजण उपस्थित होते.
तरी राज्यातील शिक्षकांनी मार्च महिन्याच्या वेतनातून एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करावे, असे राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सर्व जिल्हा व तालुका शाखेला कळविण्यात आले असल्याचे तांबारे यांनी पत्रकात म्हटले आहे.