बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: तालुक्यातील इंद्रेश्वर शुगर्सची २६ हजार टन साखर मालधक्क्यावरुन रवाना करण्यात आली. यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत, नगरसेवक नाना राऊत, संभाजी घोरपडे, पिंटू परदेशी, आर.पी.पठाण, व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    औद्योगिक नगरी बार्शीच्‍या व्‍यापार वाढीस चालना लागावी, याकरीता अनेक दिवसांपासून मालधक्‍क्‍याची मागणी होती. रेल्‍वेस्‍थानकावरुन नव्‍याने उभारण्‍यात आलेल्‍या मालधक्‍क्‍यावरुन पहिल्‍या मालगाडीचे स्‍वागत बार्शीकरांनी केले. यावेळी दोन्‍ही चालकांचे पुष्‍पहार अर्पण करुन स्‍वागत करण्‍यात आले. व्‍यापा-यांची सोय, वाहतुक भाडे, रोजगाराची उपलब्‍धता यामुळे सिमेंट, साखर, खत, धान्‍य आदींच्‍या मालासाठी चांगली सुविधा उपलब्‍ध करण्‍यात आली आहे. रेल्‍वे विभागालाही यातून चांगले उत्‍पन्‍न मिळणार आहे.
    ऐतिहासिक ब्रिटीशकालीन बार्शी लाईट रेल्‍वे बंद करण्‍यात आल्‍यानंतर सन 2008 मध्‍ये ब्रॉडगेजचा शुभारंभ करण्‍यात आला. यामुळे बार्शीसह आजूबाजूच्‍या परिसरातील नागरिकांची सोय झाली. परंतु व्‍यापारी बांधवांना दळणवळणाची साधन असतानाही गोदामाच्‍या उपलब्‍धतेशिवाय मालधक्‍का सुरु होत नसल्‍याने वारंवार मागणी करण्‍यात आली होती. 2011 मध्‍ये मालधक्‍क्‍याचे काम पूर्ण झाले. तालुक्‍यातील असलेल्‍या साखर कारखान्‍यांना याचा उपयोग होत असून इंद्रेश्‍वर शुगर्सची साखर पहिल्‍यांदा या मालधक्‍क्‍यावरुन गुजरातमधील गांधीधामकडे रवाना करण्‍यात आली.
 
Top