उस्मानाबाद : निवडणूकीचे संपूर्ण काम थांबवून शेतक-यांना मदत करण्याची भूमिका शासनाची आहे. शासन शेतक-यांच्या मागे खंबीरपणे उभे राहील असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगरूळ येथे पत्रकारांशी बोलताना म्हटले.
    मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवार रोजी गारपिटग्रस्त भागाची पाहणी केली. तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे पाहणी दौ-यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, राज्यातील २६ जिल्ह्यांना अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला आहे. गेल्या १५ दिवसांपासून ही गारपिट सुरू आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच अशी आपत्ती आली आहे. यासंदर्भात पंतप्रधानांनाही जास्तीत जास्त मदत देण्याची विनंती केली आहे. केंद्राकडे सुद्धा आम्ही दररोज नुकसानीची माहिती पाठवित आहोत. राज्य सरकार शेतक-यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून भरीव मदत देण्यात येईल. मात्र त्यासोबतच केंद्राकडून जेवढी मदत मिळेल तेवढी अधिक मदत शेतक-यांना करता येईल. या आपत्तीमध्ये पिके, घरे, माणसं, जनावरे जे जे नुकसान झाले त्या सर्व बाबतीत सर्वांना मदत करण्याची भूमिका आहे. शेतक-यांना मदत करण्यासाठी प्रसंगी बजेटमधील इतर बाबींना कात्री लावण्याची वेळ आली तरी लावू. असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
    या पत्रकार परिषदेत पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, खा. डॉ. पद्मसिंह पाटील, आ. राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील उपस्थित होते.
    मुख्यमंत्री चव्हाण यांचे सोलापूरहून हेलिकॉप्टरने तुळजापूर हेलिपॅडवर दुपारी 1 वाजता आगमन झाले. त्यानंतर ते कारने भातंब्रीकडे रवाना झाले. रस्त्यालगत शेतकरी काळ्या पडलेल्या पिकांसह थांबले होते. मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांची भेट घेऊन व्यथा जाणून घेतली. त्यानंतर भातंब्री येथील अपंग शेतकरी संजय बंडगर यांच्या गारपिटीने उद्ध्वस्त झालेल्या पपईच्या बागेला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. त्यानंतर गावातील शेतकर्‍यांसोबत चर्चा केली. मंगरूळ येथे अनेक शेतकर्‍यांनी काळी पडलेली पिके मुख्यमंत्र्यांना दाखवण्यासाठी आणली होती. या पिकांची पाहणी करून चव्हाण यांनी शेतकर्‍यांकडून माहिती घेतली. त्यानंतर ते लातूरकडे रवाना झाले.
 
Top