उस्मानाबाद -: 40-उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील मतदारांच्या कोणत्याही तक्रारीची दखल घेण्यासाठी जिल्हा निवडणक यंत्रणेने सुरु केलेल्या मदत व तक्रार निवारण कक्षास चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक नागरिक दुरध्वनीवरुन तसेच प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्या तक्रारीचे निराकरण करुन घेत आहेत.
      जिल्हा निवडणूक यंत्रणेने सुरु केलेल्या या मदत व तक्रार निवारण कक्षाची  जबाबदारी उपजिल्हाधिकारी बी. एस. चाकूरकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या कक्षातून मतदार यादीबदद्ल माहिती , मतदार यादीत नाव आहे काय ?,  नाव नसेल तर त्यासाठी करावयाची कार्यवाही आदींची माहिती  दूरध्वनीव्दारे नागरिक घेत आहेत.
        येथील जिल्हाधिकारी कार्यालयात हा कक्ष सुरु करण्यात आला आहे. आतापर्यंत विविध ठिकाणाहून नागरिकांनी दूरध्वनीव्दारे या कक्षाकडून मदत घेतली आहे. या कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 02472-222545 असा आहे. याशिवाय 1950 हा टोलफ्री क्रमांकही उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
      केवळ पुरुष मतदार नव्हे तर महिला मतदारही  दूरध्वनी करुन मतदार यादीबदृल तसेच त्यांना असणा-या शंकांचे निरसन करुन घेत आहेत. मतदारांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली  जात असल्याने त्यांना समाधान वाटत आहे.
         हा कक्ष 24 तास सुरु असून मतदारांच्या मदतीसाठी आणि त्यांना माहिती पुरविण्यासाठी तत्पर आहे. केवळ मतदार यादीबदद्ल नव्हे तर आचारसंहितेची माहिती, रॅलीचे संयोजन अशा विविध विषयांवरील माहिती विचारणारे दूरध्वनीही या कक्षाकडे येत आहेत. संबंधितांना आवश्यक ती माहिती उपलब्ध करुन देणे आणि पूरक माहितीसाठी त्या विषयाशी निगडीत कक्षाकडे विचारणा करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
        या कक्षात दोन तहसीलदार, दोन नायब तहसीलदार, 2 लिपीक आणि 2 शिपाई असा अधिकारी व कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडून ही माहिती घेवून संबंधितांचे शंकाचे  निरसन केले जात आहे.   
 
Top