उस्मानाबाद -: जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी  शुक्रवारी दुपारी अचानक पोलीस निवासस्थानास भेट देऊन पाहणी केली. पोलीसांच्या कुटूंबियांना भेडसावणा-या अडीअडचणी, तेथील स्वच्छतागृहांची स्थिती, इमारतींची स्थिती, त्याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरु असणारी कामे आदींची माहिती घेतली. पोलीस निवासस्थानातील समस्यांचा आढावा घेऊन दोन दिवसांत प्राधान्याने करण्याच्या कामांची माहिती एकत्रित करावी आणि त्यानुसार आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.
        पोलीस निवासस्थानांच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्थेबद्दल तेथील रहिवाशांनी वारंवार नाराजी व्यक्त केली होती. आज दुपारी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी याठिकाणी भेट दिली. पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. वैशाली कडूकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. देशपांडे, पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरीक्षक आदी त्यांच्यासोबत होते.
         डॉ. नारनवरे यांनी यावेळी तेथील दुरवस्थेची माहिती घेतली.  ड्रेनेजलाईनची माहिती घेतली. कामांची परिस्थिती पाहून तात्काळ काही सूचनाही केल्या. या निवासस्थानांसाठी मलनि:सारण प्रकल्प आराखडा तात्काळ तयार करा, प्राधान्याने करता येईल अशा कामांची तात्काळ यादी बनवा, असे आदेश त्यांनी बांधकाम विभागाला दिले. पोलीस कर्मचारी वसाहत आणि पोलीस अधिकारी वसाहतीतील पाईपलाईन, ड्रेनेज व्यवस्था आदींची त्यांनी पाहणी केली. पोलीस कर्मचा-यांसाठी असणारा निवास वसाहतीचा भाग हा स्वच्छ असला पाहिजे. याठिकाणी वेळच्या वेळी स्वच्छता होणे आवश्यक आहे. चांगल्या आरोग्याच्या दृष्टीने ते आवश्यक आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने हयगय न करता कामे मार्गी लावावीत, असे आदेश त्यांनी दिले. बांधकाम विभागाने केलेल्या निवासस्थान दुरुस्ती, इमारत रंगरंगोटी आदी कामांची पाहणी करुन त्यांनी समाधान व्यक्त केले.
 
Top