उस्मानाबाद :- 40- उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत जिल्ह्यात मतदारांचा चांगला उत्साह पाहायला मिळाला. या मतदारसंघात सरासरी सुमारे 68 टक्के मतदान झाले. प्रमुख उमेदवार राष्ट्रवादीचे डॉ. पद्मसिंह पाटील यांनी तेर येथे तर सेनेचे उमेदवार रविंद्र गायकवाड यांचे आष्टा कासार येथे मतदान झाले. कांही तुरळक घटना वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले.
    सकाळी ९ वाजेपर्यंंत मतदारांमध्ये शांतता होती. ९ ते १ वाजेपर्यंत मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान झाले. जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर यावेळेत रांगा लागल्या होत्या. ३ वाजेपर्यंत तब्बल ४६.१२ टक्के मतदानाची नोंद झाली. सायंकाळी ६ वाजता जिल्ह्यात जवळपास ६७.५ टक्के मतदान झाले. मागच्या तुलनेत ते ९.५ टक्के अधिक आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात ६५ टक्क्याच्या पुढे मतदान होण्याची ही तिसरी वेळ आहे. १९६७ आणि १९९९ मध्ये असेच विक्रमी मतदान झाले होते आणि त्यावेळी सत्ता परिवर्तन घडले होते. लोकसभेच्या सन 2009 च्या निवडणुकीत सरासरी 57.59 टक्के मतदान झाले होते. यावेळी सायंकाळी 5 पर्यंतच 55 टक्क्यांहून अधिक मतदान नोंदविले गेल्याने मागील निवडणुकीपेक्षा यावेळी जास्त मतदान होणार हे स्पष्ट झाले. दुपारी 3 पर्यंत लोकसभा मतदारसंघात 46.12 टक्के मतदानाची नोंद झाली होती.
    निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत नारनवरे व पोलिस अधिक्षक सचिन पाटील लक्ष देऊन होते. ढगाळ हवामान कांही ठिकाणी गारपिट व पाऊस आणि उर्वरीत ठिकाणी कडक ऊन असतानाही मतदारांनी मतदानाचा उत्साह दाखविला. यावेळी नवमतदारांची संख्या सव्वा लाख होती. त्यांच्यामध्ये मतदानाचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसुन आला. निवडणूक आयोगाचे निरिक्षक रमेशकुमार मकाडीया यांनीही अनेक मतदान केंद्रांना भेटी देऊन पहाणी केली. मतदानाच्या दरम्यान कांही ठिकाणी भांडणे आणि दगडफेकीच्या घटना घडल्या.
 
Top