उस्मानाबाद :- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत वैद्यकीय पदवी प्रवेश परीक्षेसाठी घेण्यात येणारी एमएच-सीईटी परीक्षा गुरुवार, दि. 8 मे रोजी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी होणार आहे. या परीक्षेसाठी 1 हजार 559 विद्यार्थी बसणार असून परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले.
    येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सदर परीक्षा आयोजनाबाबतची बैठक   डॉ. नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.  निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड,  अपर पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, या परीक्षा आयोजन समितीचे जिल्हा संपर्क अधिकारी डॉ. एन.एस. गंगासाखरे, उपजिल्हा संपर्क अधिकारी श्रीमती टी.ए. शेख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
          यावेळी डॉ. नारनवरे यांनी परीक्षा आयोजनात कोणतीही त्रुटी राहू नये याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना केल्या. परीक्षा केंद्रात परीक्षार्थींना चांगल्या सुविधा, पिण्याच्या पाण्याची सोय, आपत्कालिन कालावधीत वैद्यकीय प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश त्यांनी दिले. कोणत्याही परिस्थितीत कॉपीसारखे प्रकार घडणार नाहीत, यादृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी बैठे व फिरते पथक, विद्यार्थ्याच्या सोईसाठी परीक्षा केंद्र परिसरात आवश्यक ते सूचनाफलक लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
       ही परीक्षा येथील भोसले हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.     
 
Top