पांगरी (गणेश गोडसे) :-  बार्शी तालुक्‍यातील पांगरी, कारी परिसरासह शेजारील उस्मानाबाद जिल्हयाच्या सरहदीवरील अंबेजवळगे, गुंजेवाडी, कौडगांव आदी परिसरात रविवारी सायंकाळी व पुन्हा रात्री वादळी वा-यासह विजांच्या कडकडाटात तुफान गारपीठ व पाऊस झाला. गारपीठ झाल्यामुळे जमिनीवर गारांचा खच तयार होऊन या भागाला जम्मु काश्मिरचे स्वरूप प्राप्त झाले होते. अवकाळी पाऊस कांही केल्या शेतक-यांची पाठच सोडण्‍यास तयार नसुन गारपीठीमुळे या भगातील आंबा, गहु, हरभरा ही पिके नेस्तनाबुतच झाली असुन द्राक्ष बागा, ऊस या पिकांची अवस्था तर दयनीयच झाली आहे. या पिकांना जागेवर फक्त काडयाच राहील्या आहेत. नुकतेच अवकाळी पावसामुळे कुसळंब येथे विज पडुन तीन जनावरांसह सोपान कृष्णा काशिद हे 63 वर्षिय वृध्‍द शेतात कडबा बांधत असताना विज घासुन जावुन भाजल्यामुळे गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी आतानाच पुन्हा विजांच्या कडकडाटात गारपीठ झाल्यामुळे शेतक-यांसह सर्वसामान्य नागरीकांचे धाबे दणाणले असुन निसर्गाने मुद्दाम ऋतु चक्रात बदल केला की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.
    अवकाळी पावसामुळे पांगरी भागातील ज्वारी, गहु, आंबा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले असुन कारी येथील खासेराव विधाते यांच्या शेतातील 500 केसर व हापुस जातीच्या आंब्याचे शंभर टक्के नुकसान झाले असुन आंब्याची तर झाडाखाली सपरंगच पडलेली निदर्शनास येत होती. रविवारी दुपारपासुनच आकाशात काळे ढग जमा होऊ लागले होते. विजांचा कडकडाटही होत होता. मात्र कारी ,अंबेजवळे, गुंजेवाडी, भानसळे आदी भागात सायंकाळी अर्धा तासाच्या पुढे गारपीठ झाली. अर्ध्या तासाच्या गारपीठीत या भागाला काश्मीरचे चित्र निर्माण झाले होते. अवकाळी पावसामुळे अनेक भागातील ओढे वाहत होते. भाजीपाल्यांच्या पीकांवर बर्फ साचल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. कडबा भिजल्यामुळे खराब होऊन दर घसरणार आहेत. पांगरी परिसरात रविवारी रात्री अकरा वाजता वादळी वारा व भितीसदृष्य विजांचा गडगडाट यामुळे भितीयुक्त वातावरण तयार झाले होते. अचानक वादळी वा-यासह पावसाला प्रारंभ झाला. वरूणराजाने चांगलीच हजेरी लावली. यादरम्यान एक तासाच्या आसपास व पुन्हा थोडया वेळाने पुन्हा पावसाने हजेरी लावली. गत आठवडयापासुन या भागात असेच वातावरण या भागात असल्यामुळे आजही वरूणराजा येथे हजेरी लावणार अशी आशा शेतक-यांना होती. शेतक-यांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका सहन करावा लागला आहे.
    आधीच दुष्काळाच्या छायेत सापडलेल्या शेतक-यांचे अवकाळी पावसाने कंबरडेच मोडले आहे. पांगरी परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. निसर्गाच्या लहरीपणापुढे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. निसर्गाने एका क्षणात शेतक-यांचे आर्थिक स्वप्न उध्‍दवस्त केले. गत तीन वर्ष दुष्काळ तर या वर्षी अवकाळी हा नवीनच ऋतु तयार होऊन शेतक-यांचे स्वप्न उध्‍दवस्त करू लागला आहे़. या डोंगरपटयातील शेतकरी गत महिन्यात झालेल्या अभुतपुर्व गारपीठीच्या घटना विसरण्‍याच्या प्रयत्नात असताना पुन्हा पुन्हा त्या गोष्‍टींना निसर्ग उजाळा देत आहे.
 
Top