पांगरी (गणेश गोडसे) :- बार्शीहुन येरमाळयाकडे भरधाव वेगात निघालेल्या अज्ञात दहाचाकी ट्रकच्या पाठीमागील टायरला दुचाकी  जोरदार आदळुन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन व्यापारी ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सोमवार दि. 21 एप्रिल रोजी सकाळी साडे सहा वाजण्‍याच्या सुमारास बार्शी-येरमाळा मार्गावर पाथरी रेस्ट हाऊसशेजारी घडली. मृत व जखमी हे उत्तर प्रदेश राज्यातील आहेत.
    रियाज अहमद शेख (वय 25) व सदाब शेख (वय 21) दोघेही रा. नांदपार जि. भैराइच (उत्तर प्रदेश) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नांवे असुन महंमद शरीफ शेख (वय 26, रा.उत्तर प्रदेश) असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्याचे नांव असुन त्याच्यावर बार्शीच्या जगदाळेमामा रूग्णालयात उपचार सुरू असुन प्रकृती चिंताजनक आहे. अपघातानंतर ट्रकचालकाने जखमींना कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून ट्रकसह पोबारा केला.
    याबाबत अधिक प्राप्त माहिती अशी की, जखमी व मयत हे सध्या येथील बाहयवळनावरील टोलनाक्याजवळ राहण्‍यास असुन रविवार दि. 20 एप्रिल रोजी माजलगांव (जि. बीड) येथे पपईच्या बागेचा व्यवहार करून पपई ट्रकमध्ये भरून गाडया पुढे रवाना करून ते आपल्या एम.एच. 45 जी.8296 या दुचाकीवरून येरम़ाळा-बार्शी मार्गे जात होते. दरम्यान येरमाळयात आल्यानंतर अवकाळी पाऊस सुरू झाल्यामुळे त्यांनी येरमाळा येथील एका हॉटेलमध्ये जेवण करून रात्र काढली व आज सकाळी दोन वेगवेगळया दुचाकीवरून सहाजन रवाना झाले असता येरमाळयापासुन कांही किलोमीटर अंतरावर आल्यानंतर रस्त्यावरील तीव्र स्वरूपात असलेल्या वळणावर दुचाकीचा वेग नियंत्रनाबाहेर गेल्यामुळे काळाने दोघांवर घाला घातला. मयत व जखमी हे मुंबईस्थित एका बडया व्यापा-यांसाठी बाजारपेठेत फळे पाठवत होते. मुंबईतील व्यापारी यांना व्यापारासाठी बोलावुन घेत असे. पांगरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.डी. होवाळ, कमलाकर मुंढे, इंगळे, गोपाळ साखरे, आदींनी घटनास्थळावर तात्काळ धाव घेऊन जखमींना बार्शीला पाठवण्‍यासाठी प्रयत्न केले. पांगरी पोलिसात अज्ञात ट्रकचालकाविरूध्‍द अपघातास कारणीभुत ठरून पळुन गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्‍याची प्रकिया सुरू आहे.
     मृत सदाब शेख याच्या मोठया भावाचा विवाह ठरलेला होता तर सदाबच्या विवाहाचीही पुवर्स्तयारी सुरू होती. मात्र विवाहाची इच्‍छा पुर्ण होण्‍याअगोदरच काळाने त्याला हिरावुन नेले. घटनास्थळावर रक्ताचा सडा पडल्यासारखी परिस्थती निर्माण झाली होती. दुचाकीजवळ व्यापारी तरूणांच्या पिशव्या व इतर साहित्य विखुरलेले होते. त्यामुळे पाहणा-यांचे मन हेलावत होते. सुदैवाने अपघातग्रस्त दुचाकीला लागुनच चालत असलेल्या दुस-या गाडीवरील चालकाने दुचाकी नियंत्रीत केल्यामुळे त्यांचे प्राण वाचले.
 
Top