मकरंद रानडे
निवडणूकीच्या वेळेस मतदान बुथवर वशिलीबाजी होऊ नये, स्थानिक पोलीसांच्या ओळखीचा फायदा उमेदवाराला मिळू नये, यासाठी बाहेरुन आलेला पोलीस बंदोबस्त मतदार केंद्रावर लावण्यात येणार आहे. भयमुक्त वातावरणात या निवडणुका पार पडाव्यात यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. पोलीस प्रशासनाच्या या सज्जतेविषयी सांगताहेत, सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून नुकतेच रुजु झालेले मकरंद रानडे....

*  लोकसभा निवडणूकीसंदर्भात पोलीस प्रशासनातर्फे कशाप्रकारे तयारी
      करण्यात आली आहे ?

→ सोलापूर जिल्हा विस्ताराने बराच मोठा आहे मात्र याचा पोलीस प्रशासनावर परिणाम होणार नाही. पोलीस विभाग या निवडणूकीसाठी पूर्ण तयारीनिशी सज्ज आहे. सध्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढून त्यांना समन्स देणे चालू आहे. मध्यरात्री वाहनांची चेकिंग तसेच कोम्बींग ऑपरेशनही सुरु आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या संवेदनशील गावांमध्ये नियमितपणे पोलीस रुट मार्च सुरु आहे. त्याचबरोबर कर्नाटक, महाराष्ट्र सीमावर्ती भागात गुन्हेगार व गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी 10 ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे.


* निवडणूकीतील बंदोबस्त तयारीबाबत ?
→ सोलापूर जिल्ह्यात दुस-या टप्प्यात मतदान होणार असल्याने बाहेरुन मोठा बंदोबस्त येणार आहे यामध्ये 5 सहायक पोलीस आयुक्त, 80 पोलीस निरिक्षक - उप निरिक्षक, राज्य राखीव दलाच्या (एस.आर.पी.) 2 तुकड्या, केंद्रीय राखीव दलाच्या 3 तुकड्या (सी.आर.पी.एफ.) 1500 पोलीस, 1000 होमगार्ड याशिवाय सोलापूर ग्रामीण पोलीसांचे जवळपास 1700 कर्मचारी निवडणूक काळात म्हणजेच 12 ते 18 एप्रिल या कालावधीत उपलब्ध होणार आहेत. राजकीय चुरस व संवेदनशील अशा मतदान केंद्रांच्या ठिकाणी जादा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. हा बंदोबस्त बाहेरुन येणा-या पोलीस अधिकारी - कर्मचा-यांचा असेल.
                       
* जिल्हा ग्रामीण पोलीस दलामार्फत आत्तापर्यंत करण्यात आलेल्या एकूण   कारवाईबद्दल सांगा?
→ निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील 3571 शस्त्र परवाना धारकांपैकी सुमारे 2300 शस्त्रे जमा करुन घेण्यात आली असून उर्वरित शस्त्रे जमा करुन घेणे सुरु आहे मात्र यामधुन बँका, टोलनाके, पेट्रोलपंप व सुरक्षिततेशी निगडीत असणा-यांना यातून सुट देण्यात येणार आहे. त्याचबरोबर फरार 73 व 171 वॉन्टेड आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 5883 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे तर 488 जणांकडून हमीपत्र लिहून घेण्यात आले आहे.

*  शेवटी काय सांगाल ?
→ लोकशाहीच्या या उत्सवामध्ये मतदारांनी पोलीसांना पूर्णपणे सहकार्य करावे, मतदान केंद्रावर शांतता पाळावी, अफवांवर विश्वास ठेवून नये, निवडणूक काळात आर्थिक तसेच इतर गैरप्रकार निदर्शनास येत असल्यास स्थानिक पोलीसांना तात्काळ कळवावे. तसेच 0217- 273209/273210/273000 या दुरध्वनी क्रमांकावर नागरिकांनी संपर्क करावा. सर्व पोलीस अधिकारी - कर्मचारी यांना आपल्या मतदानाचा हक्क बजाविता यावा यासाठी त्यांना पोस्टल बॅलेटची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
    शेवटी मी इतकेच सांगेन की, निवडणूका शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे मात्र याला साथ हवी आहे ती जनता... जनार्दनाची    
कारण, ' असेल जनतेची साथ - तर जमेल बात ' 

  -  फारूक बागवान 
     (9881400405)
   उप माहिती कार्यालय,पंढरपूर
 
Top