बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : मुलीचा जन्मदर घसरत आहे याचा भविष्यात विपरित परिणाम होईल. मुलांच्या बेकारीच्या प्रश्नासोबतच यापुढे विवाहाची गंभीर समस्या निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. मुलींची संख्या वाढिवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची सत्ता येताच गरिबांच्या घरी मुलगी जन्माला आल्यावर तिच्या नावाने रक्कम ठेवण्यात येईल, मुलगी अठरा वर्षांची झाल्यावर तिला एक लाख रुपये देण्यात येईल व गरिबांची मुलगी जन्मत:च लखपती आणि गृहलक्ष्मी म्हणूनच जन्माला येईल, असे आश्वासन राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिले.
     वैराग (ता.बार्शी) येथे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ना. पाटील हे बोलत होते. बुधवारी रात्री विदयामंदीर परिसराच्या आवारात ही सभा घेण्यात आली. पावसामुळे गावातील मार्केट यार्ड येथे आयोजित केलेल्या सभेचे अचानकपणे ठिकाण बदलण्यात आले होते.
     यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक राजाभाऊ पिंपरकर, डॉ.पद्मसिंह पाटील, पालकमंत्री दिलीप सोपल, माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, मनोहर सपाटे, अरुण कापसे, दिलीप कोल्हे, अल्पसंख्यांक सेलचे अबिब फकीर, निरंजन भूमकर, रमजानभाई पठाण, नागेश अक्कलकोटे, मकरंद निंबाळकर, तानाजी मांगडे, हरिभाऊ पाटील, जे.टी.शिंदे, अब्बास शेख, कुमार पौळ, काका गलांडे, शिवाजी गायकवाड, योगेश सोपल, तेजस्विनी मरोड, गोकर्णा डिसले, मु.मा.देशमुख, विनायक गरड, मंदाताई काळे, उषाताई गरड, ॲड. विवकास जाधव, अरुण सावंत यासह तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
     आर.आर.पाटील म्हणाले, यावेळच्या निवडणुका या केवळ खासदार निवडून देण्यापुरत्या मर्यादित नाही तर हा देश गांधींच्या विचाराने चालवायचा की नाही हे ठरविणार्‍या व पुरोगामीत्वाच्या बाबत विचार करणार्‍यासाठी आहेत. देशाचे कृषिमंत्री, अनेक वर्षांचा समाजकारण व राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव अशा व्यक्तींच्या चारित्र्यावर चिकलफेक करुन हाणामारीची भाषा करणार्‍या उमेदवाराच्या बाबत मतदारांनी विचार करण्याची गरज आहे. माझ्यासारख्या शांत आणि संयमी माणसालादेखील डॉ.पाटील यांच्या तरुणपणातील ठोशास ठोसा देण्याची कृती करावी असे वाटते. नामांतराला विरोध करणार्‍या पक्षासोबत आठवले यांचे सुर जुळले असल्याने त्यांचे नाव आठवले ऐवजी विसरले असेच ठेवायला पाहिजे, आठवले हे नागपूरच्या दिक्षाभूमीला विसरुन ठाकरेच्या रेशीम बागेत फिरत आहेत, अशी टिकाही त्यांनी केली. सदाभाऊ खोत हे टायर पेटवून शेतकर्‍यांची दिशाभूल करत आहेत. परंतु यापुढे ऊस दराबाबत यापुढे शेतकरी सभासदांना विश्वासात घेऊन त्रस्त समिती विचारपूर्वक निर्णय घेईल व तसे त्यांना अधिकार देण्यात येणार आहेत, त्यामुळे शेतकरी संघटनेचा ऊस दराबाबतचा गाशा गुंडाळण्यात येईल व सर्वसामान्यांना त्रास होणार नाही. माढा हा माझा मतदारसंघ आहे असे सांगणार्‍या महादेव जानकर यांना गडकरी यांनी अत्यंत हुशारीने सुरक्षित मतदारसंघ असल्याचे सांगून फसवणूक केली आहे. पाच जणांमध्ये सहावा भिडू घेणार नाही असे गोपीनाथ यांनी म्हटले होतं तर, विनायक मेटेंना पक्षात घेऊन सहावा भिडू कसा काय घेतला. आरक्षणाच्या मुद्यावर आझाद मैदानावर मोर्चा घेतला. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या सकारात्मक भूमिकेने ओबीसीच्या आरक्षणास धक्का न लावता गरिब मराठा समाजबांधवांना शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण देण्याची भूमिका घेतली होती. तरीदेखिल मेटे यांची भूमिका संशय निर्माण करणारी आहे. गुजरात पेक्षा महाराष्ट्र अनेक बाबतीत अग्रेसर आहे. सरकारने अन्नसुरक्षा, राजीव गांधी आरोग्य योजना यासारख्या अनेक योजना सुरु केल्या आहेत. विरोधकांनी 40 कोटींच्या सिंचनाच्या कामात 70 कोटींचा घोटाळा झाल्याची बोंब केली त्यांना तुमचा गणिताचा मास्तर कोण होता व कुणी हे गणित शिकवले, म्हशीपेक्षा रेडकू कसे काय मोठे झाले, त्यावर विरोधकांनी आम्ही विरोधकच आहोत असेच बोलणार असल्याचे सांगीतले. चारा छावणीचा घोटाळा झाला म्हणत तावडे यांनी उकिरडा फुंकला पण काही हाती लागले नाही. दुष्काळात गुजरात राज्यातून देण्यात आलेल्या चारा मदतीचे बिल पाठवले अशा दानत नसलेल्यांची भूमिका लोकांनी लक्षात घ्यावी. शेतीवर आणि शेतकर्‍यांवर प्रेम करणार्‍या शरद पवार साहेबांवर निष्ठा असलेल्या नागरिकांनी या निवडणूका महत्वाच्या आहेत असे लक्षात ठेवा असंही त्यांनी यावेळी सांगितले.
     ना. दिलीप सोपल, अबिब फकी, राजन पाटील, डॉ.पद्मिसंह पाटील यांनी यावेळी विचार व्यक्त केले. कुमार पौळ यांनी प्रस्ताविक केले तर सूत्रसंचलन नागेश अक्कलकोटे यांनी केले तर आभार भगवान पवार यांनी मानले.
 
Top