बार्शी  (मल्लिकार्जून धारुरकर) :- मांडेगाव ( ता.बार्शी ) येथील शेतकर्‍यांच्या जमीनीचे प्रत्यक्ष पंचनामे न करताच काही गारपीटग्रस्तांना अनुदान जाहीर करण्यात आले आहे. सदरच्या गावातील अनेक शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने वंचित शेतकर्‍यांच्या शेतात प्रत्यक्ष पंचनामे करुन अनुदानाचा लाभ मिळवून द्यावा याकरिता ग्रामस्थ, शेतकरी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आदींनी तहसिलदार यांना लेखी निदेदन दिले आहे.
        यावेळी मांडेगावचे सरपंच भिमराव दळवी, उपसरपंच गौतम मिरगणे, नवनाथ मिरगणे, विलास मिरगणे, पंडित मिरगणे, भागवत पायघन व ग्रामस्थ उपस्थित होते. मांडेगावसारख्या इतरही अनेक गावातील शेतकरी मोठ्या संख्येने बार्शी तहसिलमध्ये गर्दि करत असून पंचनामे व अनुदानाबाबत अनेक तक्रारी होत असल्याने सदरच्या पंचनाम्यात नेमका किती घोळ झाला याचा अंदाज कार्यालयातील कर्मचार्‍यांनाही समजून येत नाही. लोकसभा निवडणूकांच्या पूर्वी आलेल्या संकटात शेतकर्‍यांना लाभ मिळवून दिला तर मतांच्या संख्येवर चांगला परिणाम होईल यामुळे सत्ताधारी पक्षाच्या वतीने कर्मचार्‍यांना दुमडून कामाला लावण्यात आले होते. कर्मचार्‍यांवर अचानकपणे आलेल्या दडपण आणि ताणातून चुकीच्या पंचनामे, घरी बसून पंचनामे, काही चिरीमिरी घेऊन पंचनामे अशा विविध प्रकारच्या घटना दिसून आल्या. यावेळी अचानकपणे सातबारा उतार्‍यांना देखिल मोठ्या रकमा अदा करण्यात आल्या. अनुदानाची चांगली रक्कम मिळेल या आशेने अनेक शेतर्‍यांनी मागेल तेवढी फि देण्याची तयारी दर्शवून आपले पंचनामे ओके करण्याचा प्रयत्न केला. तर अनेक शेतकर्‍यांना तलाठी कुठे आहेत याचा शोध घेण्यासाठी पंधरा वीस दिवस लागले. एकूण गोंधळाच्या परिस्थितीतच अनुदानाची रक्कम जाहीर करण्यात आली. तहसिलदार यांनादेखिल कामाचे दडपण राहिल्याने सलग आठ ते दहा दिवस रात्री उशीरा तीन ते साडेतीन वाजेपर्यंत अनुदानाच्या चेकवर सह्या कराव्या लागल्या. अनेक कर्मचार्‍यांनी इमानदारीने कामे केली परंतु लोकांची तक्रार वाढत असल्याने तहसिलमध्ये गर्दी वाढत चालली आहे.


 
Top