बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : वैराग खुनातील सहा आरोपींना बार्शी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायदंडाधिकारी व्ही.बी.मुल्ला यांनी दि. 6 मेपर्यंत सात दिवसांच्या पोलिस कोठडीची शिक्षा सुनावली.
    याबाबत अधिक माहिती अशी, पूर्व वैमनस्यातून विठ्ठल उर्फ इच्चप्पा मारुती पवार यांचा निर्घूण खून करण्यात आला. सदरच्या घटनेतील २० आरोपी फरार झाले होते. घटनेनंतर वैराग परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले व त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. पवार याच्या खूनानंतर मृताच्या नातेवाईकांनी व संतप्त जमावाकडून संशयीत आरोपींचे दुकान, वाहने, घर इत्यादी तोडफोड व पेटवून देण्याचे प्रकार घडले होते.
    फरार आरोपींच्या शोधासाठी तज्ञ पोलिसांची विविध पथके तयार करुन जलद गतीने शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. बार्शी पोलिसांच्या पथकाने केलेल्या कारवाईत शिवाजी आण्णा पवार (वय २३), शंकर उर्फ बाबा सुभाष पवार (वय २५), सुनिल अशोक पवार (वय ३०) सर्व रा.इंदिरानगर, वैराग असे तीन आरोपी अटक करण्यात आले. दुसर्‍या दिवशी माढा पोलिसांच्या पथकास धनगरवाडी येथे सागर भारत पवार (वय २०), वैराग पोलिसांच्या पथकास शशिकांत चंदू घोडे (वय २०), तसेच आरोपींना पळून जाण्यासाठी वाहन पुरविणारा बप्पा लावंड रा.बार्शी अशा आणखी तीन आरोपींना अटक करण्याकामी यश मिळाले आहे.
    आरोपींना न्यायालयात हजर करतांना कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयाच्या आवरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
    विठ्ठल पवार यांच्या खूनाशी संबंधीत उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके विविध भागात रवाना झाली असून लवकरच ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करण्यात येईल अशी माहिती पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांनी दिली.
 
Top