पांगरी (गणेश गोडसे) -: कधी काळी हळद ऊत्पादनात जिल्हयात अग्रस्थाणी असलेल्या मात्र सध्या हळद लागवडीच्या क्षेत्रात मोठया प्रमाणात घट झालेल्या पांगरी परिसरात नगदी पिक अशी ओळख असलेल हळद पिक शेवटच्या घटका मोजत आहे. पुर्वीच्या काळात हळद उत्पादनात अग्रभागी असलेल्या घारी, चारे, पांढरी, उक्कडगांव, शिराळे, पाथरी, ममदापुर आदी परिसरात हळद पिकांचे मोठया प्रमाणात उत्पादन घेतले जात असे. मात्र सतत निर्माण होणा-या भीषण दुष्काळी परिस्थतीमुळे हळद लागवडीच्या प्रमाणात मोठी घट झाली असुन हळद उत्पादक शेतक-यांमधुन चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
      2011 मध्ये हळदीला 25 हजार रूपयांपर्यंतचा दर मिळाला होता. मात्र 2012 व 13 मध्ये हळद उत्पादकांच्या पदरी निराशाच पडली. पिवळ सोनं असही हळदीसंदर्भात म्हटल जाते. त्यामुळे 2011 व्यावर्षी हळद उत्पादक शेतक-यांची चांगलीच चांदी झाली होती. यावर्षीही 8 ते 10 हजार रूपयांच्या आसपास हळद पिकास दर मिळत आहे. त्यामुळे याभागातील नवीन शेतक-यांनी गतवर्षी या भागात मोठया प्रमाणात हळदीची लागवड केली होती. शेतक-यांनी अल्पशा पाण्यावर गतवर्षी हळद पिक जोपासले. मात्र यावर्षी पडलेल्या जेमतेम पावसामुळे शेतक-यांचे पाण्याचे सर्वच स्‍त्रोत संपलामुळे हळदीची पीके वाळुन जाऊन लागवडीत मोठी घट झाली आहे. तसेच दरही म्हणावा तसा नसल्यामुळे उत्पादक पुन्हा अडचणीत आला आहे.
     कोरडया व ऊष्ण हवामानात येणारे व शेतक-यांचे नगदी पिक म्हणुन हळद हया पिकाची ओळख सर्वश्रुत आहे. कांही वर्षांपुर्वी तर पाण्याच्या मुबलक उपलब्धतेमुळे बार्शी तालुक्यात हळदीचे मोठया प्रमाणात ऊत्पादन घेतले जात होते. मात्र कालंतराणे परिसरात पावसाचे प्रमाणही कमी कमी होत गेले. तसेच नंतर हळदीच्या पिकांना कंदमाशी, खोडकिडा पाने खाणारी व गुंडाळणा-या आळीचा प्रादुर्भाव व कवले कीड आदी विविध रोगांनी ग्रासले. त्यामुळे शेतक-यांनी हळद लागवड बंद करुन ते इतर पिकांकडे वळले होते. पांगरी परिसर हा तसा हळद पिकांसाठी अतिशय पोषक भाग आहे. बार्शी तालुक्यातील ऊत्पादनामुळेच कांही वर्षांपुर्वी बार्शीची बाजारपेठ ही संपुर्ण महाराष्ट्रात अग्रस्थानी होती.
    हळदीस पुर्वीपासुनच आयुर्वेदात अतिशय महत्व असुन हळदीचा जेवणातही एक आवश्यक घटक म्हणुन महत्व आहे. हळद हा मसाल्यातील एक घटक असुन हळदीच्या थोडाश्या चिमटीमुळे भाजीला वेगळीच चव येते. हळदी औषधी व आयुर्वेदिक गुणांमुळे भारतात अगदी पुरातन काळापासुन दैनंदिन वापर होतो. हृदयविकार, रक्तस्त्राव अथवा छोटीशी जखम झाल्यास हळदीचा वापर होतो. हळदीत वातनाशक गुणधर्म असल्यामुळे मधुमेह रूग्णांनाही दुधात वापर केला जातो. घसा दुखणे, खोकला यावरही बहुगुणी असलेल्या हळदीचा उपयोग होतो. जगात हळद पिकवणा-या प्रमुख देशापैकी भारत हा एक महत्वाचा देश म्हणुन ओळखला जातो. हळदीच्या पिकांसाठी गाळाची व चांगल्या प्रतीची जमीन आवश्यक असते. वाफा पध्‍दतीनेच हळदीची लागवड केली जाते. हळद हे जमिनीत वाढणारे खोड असल्यामुळे जमिन जेवढी जास्त भुसभुसित व उच्च प्रतीची तेवढेच ऊत्पन्नही चांगले मिळते. हळदीसाठी रासायनिक खतासह सेंद्रीय खतांचा योग्य पध्‍दतीने वापर केल्यास चांगले उत्पन्न हातात पडते. हळदीच्या लागवडीसाठी निवडक अशा प्रकारच्या बियांनांची निवड करावी लागते़. पिकाची लागण अतिशय योग्यवेळीच करावी लागते. तेव्हाच अपेक्षित ऊत्पन्न मिळते. हळद हे नऊ महिन्यात येणारे पिक असुन हळदीची पाणे पिवळी पडल्यानंतर व संपुर्ण पाणांनी माना टाकल्यानंतरच हळद पिक काढावे लागते.
   हळद ही उकरून जमिनीबाहेर काढली जाते. ती पुर्वी मोठया कढईत टाकुण शिजवली जात असे. मात्र आता आधुनिक पध्‍दतीने कुकरच्या आधारे हळद शिजवली जात आहे. नंतर तीन भागात विभागणी केली जाते. हळकुंड गड्डा व सोयरा असे तीन विभागात हळदीचे विभाजन केले जाते. नंतर वाळवुन ते बार्शी व सांगली येथील बाजारपेठेत पाठवले जाते. 2011 मध्ये हळदीचे उत्पादन घेतलेल्या शेतक-यांनी एकरी जवळपास एक लाखांच्याही पुढे ऊत्पादन घेतले होते. त्याचीच पुनरावृत्ती होऊन आपले भाग्य कधीतरी उजळेल या आशेने या भागातील हळद उत्पादक प्रयत्‍न करत आहेत. मात्र तो दर मृगजळ ठरू नये.
    सध्या हळदीच्या दरात मोठी घसरण झाली असल्यामुळे उत्पादकांमधुन नाराजी व्यक्त होत आहे. हळदीचे क्षेत्र वाढवण्‍यासाठी व ते टिकवण्‍यासाठी शासनाने हळद या बहुगुणी पिकास हमीभाव देऊन त्यांना अनुदान द्यावे, तेव्हाच या भागातील शेतकरी पुन्हा हळद लागवडीकडे वळुन हळद उत्पादनात भरीव वाढ होऊन या भागाला गतवैभव प्राप्त होईल अशी हळद ऊत्पादक शेतक-यांची मागणी आहे.
 
Top