मुख्‍याध्‍यापक व शिक्षक यांच्‍या अंतर्गत वादामुळे गेल्‍या सहा महिन्‍यापासून हजेरी पत्रकावर स्‍वाक्षरी न करता संबंधित शिक्षकास पाच महिन्‍याचे मासिक वेतन अदा केल्‍याची खळबळजनक घटना बोळेगाव (ता. तुळजापूर) येथील जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळेत घडल्‍याचे उघडकीस आले आहे.
            तुळजापूर तालुक्‍यातील बोळेगाव जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्‍याध्‍यापकासह सात शिक्षक कार्यरत आहेत. तर शाळेत 177 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षकांपैकी संजय गोरखनाथ लांडगे या शिक्षकास दि. 31 ऑगस्‍ट 2013 रोजी उमरगा येथे जिल्‍हास्‍तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी मुख्‍याध्‍यापिकाने प्रयोग सादरीकरणासाठी पाठविले होते. शिक्षक त्‍या विज्ञान प्रदर्शनासाठी उपस्थित नसल्‍याचे मुख्‍याध्‍यापिका श्रीमती मोरे यांना विज्ञान प्रदर्शनातील अधिका-यांनी फोनवरुन कळविले. त्‍यानंतर त्‍या  उमरगा येथे गेल्‍या व सदर ठिकाणी शिक्षक नसल्‍याचे निदर्शनास आले. त्‍यानंतर सदर शिक्षकास विज्ञान प्रदर्शनात का गैरहजर राहिलात? याबाबतचा खुलासा मागविल्‍याचे मुख्‍याध्‍यापिकेने सांगितले. मुख्‍याध्‍यापिकेनी सदर शिक्षकास प्रयोगासाठी दिलेले शैक्षणिक साहित्‍य शाळेत जमा करावे व त्‍यानंतरच आपणास उपस्थिती पत्रकावर सह्या करु दिल्‍या जातील, असे तोंडी सांगितले. सदर शिक्षकाने प्रयोगासाठी दिलेले साहित्‍य स्‍वःखर्चाने घेतले आहे, म्‍हणून शाळेत जमा करण्‍यास स्‍पष्‍ट नकार दिला. तेंव्‍हापासून सदर प्रकरण वाढीस लागले आहे.
           दरम्‍यान, याप्रकरणी मुख्‍याध्‍यापिकेने सहशिक्षक लांडगे यास हजेरी पत्रकावर सह्या करण्‍यास प्रतिबंध केला असल्‍याचे ‘पंचायत समिती तुमच्‍या दारी’ हंगरगा (नळ) ता. तुळजापूर येथे दि. 21 डिसेंबर 2013 रोजी झालेल्‍या कार्यक्रमासाठी आलेल्‍या गटशिक्षणाधिकारी सविता भोसले यांना समजले. त्‍यानंतर दि. 27 डिसेंबर रोजी मुख्‍याध्‍यापिकेस कारणे दाखवा नोटीस देवून याबाबत दोन दिवसात खुलासा मागविला. मात्र सप्‍टेंबर 2013 ते दि. 31 जानेवारी 2014 पर्यंतचा पगार सदरील शिक्षकाने उचलला होता. त्‍यामुळे खुलासा काय द्यावा, या द्विधा मनस्थितीत मुख्‍याध्‍यापिकेने सदरील घटना वरिष्‍ठांना कळविले नसल्‍याचे कबूल केले. त्‍यामुळे हे प्रकरण तांत्रिक अडचणीत अडकले आहे.
             या प्रकरणाची गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला माहिती कळल्‍यापासून हजेरी पत्रकावर संबंधित शिक्षकाच्‍या सह्या करुन घेण्‍याचे आदेश दि. 21 जानेवारी 2014 रोजी शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापिकेस पत्राद्वारे दिले आहे. त्‍यानंतर लांडगे यांनी दि. 3 सप्‍टेंबर 2013 पासून हजेरी पत्रकावर सह्या करु दिल्‍याशिवाय जानेवारी 2014 पासूनच्‍या सह्या करणार नसल्‍याचे दि. 27 जानेवारी रोजी लेखी कळविले आहे. हजेरी पत्रकावर शिक्षकाच्‍या सह्या नाहीत, ही गंभीर बाब तीन महिने शिक्षण विभागाच्‍या लक्षात आली नाही. हजेरी पत्रकाची खातरजमा न करताच पगार काढल्‍याची गंभीर चूक गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून झाली आहे.
           दि. 3 सप्‍टेंबर 2013 पासून हजेरी पत्रकावर सह्या नाहीत, तरीही मुख्‍याध्‍यापिका श्रीमती मोरे यांनी शिक्षण विस्‍ताराधिकारी जळकोट यांना दि. 4 फेब्रुवारी 2014 रोजी संबंधित शिक्षक यांच्‍या उपस्थितीबाबत अहवाल पाठविला असून लांडगे हे 3 सप्‍टेंबर ते 31 डिसेंबर 2013 पर्यंत काम केल्‍याचे लेखी कळविले  आहे. यामध्‍ये सप्‍टेंबर महिन्‍यात एक दिवस गैरहजर, ऑक्‍टोबर व नोव्‍हेंबरमध्‍ये एकही दिवस गैरहजर नाहीत, तर डिसेंबर महिन्‍यात तीन दिवस गैरहजर असल्‍याचे लेखी पत्राद्वारे कळविले आहे. त्‍यानी संबंधित शिक्षक हजर असल्‍याचे वरिष्‍ठाना एकीकडे लेखी कळविले, तर दुसरीकडे उपस्थिती पत्रकावर सह्या का करु दिल्‍या नाहीत? याचे गौडबंगाल काय?
           सदर प्रकरणी शिक्षण विभागाने हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्‍याने सदर शिक्षकास शाळेत हजर राहून अध्‍यापन करुनही मुख्‍याध्‍यापिकेचे अज्ञान व हेकेखोरपणामुळे मागील सहा महिन्‍यांपासून हजेरी पत्रकावर सह्या करता आल्‍या नाहीत. ही गंभीर बाब असून याबाबत दोषीवर कडक कारवाई, अशी मागणी पालकांतून होत आहे.
    या संदर्भात गटशिक्षणाधिकारी सविता भोसले यांच्‍याशी संपर्क साधले असता, सदर प्रकरणी मुख्‍य कार्यकारी अधिका-यांच्‍या सुचनेनुसार शाळेला भेट देऊन मुख्‍याध्‍यापक, सहशिक्षक, केंद्रप्रमुख यांच्‍याकडील उपलब्‍ध कागदपत्रे व संबंधितांचे जबाब घेऊन सदर अहवाल उस्‍मानाबाद जि.प. चे मुख्‍यकार्यकारी अधिकारी यांच्‍याकडे सादर केले आहे. सदर शिक्षकाचे वेतन माहे फेब्रुवारीपासून अदा करु नये, असे लेखी आदेश दिले आहेत.
    एकंदरीत, शिक्षकांकडून भावी पिढी घडविण्‍याचे पवित्र कार्य होत आहे. अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून अध्‍यापन करण्‍याची गरज असताना शिक्षक अंतर्गत कुरखोड्या करीत असल्‍यामुळे शिक्षणाचे नुकसान होत आहे. यासाठी पालकांनी जागरुक राहून शाळांवर लक्ष देण्‍याची गरज आहे.
    सहशिक्षक लांडगे यांना विचारले असता, मी उमरगा येथील विज्ञान प्रदर्शनास तीन दिवस उपस्थित राहून प्रयोगाचे सादरीकरण केले आहे, माझी तिथे गैरहजरी असल्‍यास माझ्यावर नियमानुसार कारवाई करावी व दि. 3 सप्‍टेंबर 2013 पासून उपस्थित पत्रकावर सह्या करण्‍याची परवानगी द्यावे, असे लांडगे यांनी बोलताना सांगितले.
    मी एक महिला मुख्‍याध्‍यापिका असल्‍याने स्‍थानिक पातळवरील काही सहशिक्षकांकडून असहकार्याची भूमिका असल्‍याचे सांगितले. सदर प्रकरण गंभीर आहे, या बाबीचे गांभीर्य आपल्‍या लक्षात आले नाही. त्‍यामुळे याबाबत वरिष्‍ठांचे मार्गदर्शन मागविले आहे, असे मुख्‍याध्‍यापिका श्रीमती एम.बी. मोरे यांनी बोलताना सांगितले. 

- शिवाजी नाईक

 
Top