बाशी (मल्लिकार्जून धारुरकर) :- बार्शीकरांनी अनेक चांगले राजकिय नेते दिले. ज्येष्ठ भगिनी प्रभाताई झाडबुके यांच्यासह अनेकांनी साथ दिली, नागरिकांनी अनेक वर्षे सर्व शक्ती नामदार दिलीप सोपलांच्या हाती दिली, महाराष्ट्र राज्याच्या सहकारातील महत्वाची जबाबदारी बार्शीकरांच्या माध्यमातून सोपल यांची नियुक्ती करुन संपूर्ण जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी व जिल्ह्यातील दुष्काळ कायमचा संपवण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन सोपल यांच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली आहे. आम्हाला काम करण्याची संधी देण्यासाठी डॉ.पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे मत कृषिमंत्री ना.शरदचंद्रजी पवार यांनी व्यक्त केले.
    लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमिवर आयोजित केलेल्या डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ बार्शीतील भगवंत मैदान येथे जाहीर सभेत ते बोलत होते. शरद पवार हे तब्बल दहा वर्षांनंतर बार्शीकरांसाठी सार्वजनिक ठिकाणी भाषण करत होते. पंढरपूरच्या एकादशीपाठोपाठ बार्शीचे द्वादशीचे महत्व आहे, भगवंत नगरीत आल्यावर आनंद झाला. पूर्वी पालकमंत्री असतांना नेहमी येत होतो असा खास उल्लेख त्यांनी यावेळी केला.
     यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष कादर तांबोळी, डॉ.पद्मसिंह पाटील, पालकमंत्री दिलीप सोपल, उस्मानाबादचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, माजी आमदार बाबुराव नरके, आर्यन सोपल, सुधीरभाऊ सोपल, गटनेते नागेश अक्कलकोटे, रमजानभाई पठाण, अब्बासभाई शेख, मकरंद निंबाळकर, ऍड्.विकास जाधव, तानाजी मांगडे, नवनाथ चांदणे, विलास रेणके, संभाजी देशमुख, शिवाजी गायकवाड, निरंजन भूमकर आदी उपस्थित होते.
    शरद पवार म्हणाले, चांगल्या कामगिरी करणारांना टप्प्यानुसार पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न अशा पदवी देण्यात येतांना परंतु खेड्यापाड्यातील कष्टकरी शेतकर्‍यांना मात्र कायमस्वरुपी थकबाकीदार ही पदवी मिळत होती. सातत्याने त्यांच्या डोक्यावर सोसायटीचे कर्ज होते, यावर राष्ट्रवादी - कॉंग्रेसच्या सरकारने चांगली भूमिका घेऊन ७१ हजार कोटींचे कर्ज एका हुकूमाने माफ केले त्यामुळे त्यांना नवीन कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा झाला. व्याजदरात १२ टक्क्यावरुन कमी करुन ८ टक्के, त्यानंतर ६ टक्के, त्यानंतर ४ टक्के करुन वेळेत कर्ज परत करणारांना ० (शून्य) टक्के दराने कर्ज पुरवठा करण्यात आला त्याचा बहुसंख्य शेतकर्‍यांना फायदा झाला. त्यामुळेच शेतकर्‍यांना बि-बियाणे, खते, औषधे वेळेवर घेता आली. त्याचा चांगला फायदा झाला व ५ वर्षांपूर्वी अन्नधान्य आयात करणार्‍या भारत देशाकडून १८ देशांना अन्नधान्य निर्यात करता आली, काळ्या आईची सेवा करुन आपल्यासह र्इींरही देशाच्या भुकेचा प्रश्‍न सोडविण्याची संधी आपल्या देशातील शेतकर्‍यांना मिळाली. २१३ दशलक्ष टन अन्नधान्य निर्यातीतून जगातील १८ देशांत वेगळे स्थान निर्माण करता आले. गहू, तांदूळ, कापूस, साखर इत्यादींची निर्यात करुन कधी नव्हे तेवढे २३२ लाख कोटी रुपयांचे उत्पन्न भारतास मिळाले. त्यामुळे देशातील शेतकर्‍यांचा शेतीमालास योग्य किंमतही देता आली, वाजपेयी सरकारच्या तुलनेत प्रचंड मोठी अन्नधान्यास किंमत मिळाल्याने शेतकर्‍यांच्या शेतीमालास दर मिळाला. त्याच बरोबर देशातील गरीब नागरिकांसाठी अन्न सुरक्षा योजना आणली व २ रुपये दराने तांदूळ, ३ रुपये दरात गहू देण्याची व्यवस्था झाली. त्याचा फायदा ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांबरोबरच शहरातील नागरिकांनाही झाला. दुष्काळ, गारपीट आदी संकटाच्या काळात मदत देण्याची भूमिका सरकारने घेतली. औद्योगिकरण, उद्योग व्यापार वाढवून देशाला संपन्न बनविण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे असेही ना.पवार यांनी यावेळी म्हटले.
    आमदार दिलीप सोपल यांच्या तिसर्‍या पिढीतील युवा नेतृत्व आर्यन सोपल यांनी यावेळी भाषण केले. यात बोलतांना तरुणांनी आदर्श घ्यावा असे नेतृत्व डॉ. पद्मसिंह पाटील यांचे आहे, काळ्या आईची सेवा करणारे, सक्षम नेतृत्व, रिचेबल नेतृत्व, महाराष्ट्राचा मानबिंदू जाणता राजा शरदचंद्र पवार यांना कायम साथ देणारे डॉ. पद्मसिंह पाटील त्यांच्या कामाची पोचपावती देण्याची वेळ आहे. आजोबा दिलीप सोपल यांनी स्वत:ला बार्शीकरांच्या सेवेसाठी वाहून घेतले आहे, जनतेचे सुख:दुख त्यांना समजतात, पवार साहेबांच्या योगदानामुळेच आज सर्व काही चांगल्या स्थितीत असल्याचेही युवा नेतृत्वाने व्यासपीठावरुन सांगीतले.
    खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, पालकमंत्री दिलीप सोपल, नवनाथ चांदणे यांनी यावेळी विचार मांडले, भगवान पवार यांनी सुत्रसंचलन केले. ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्ते, नेते व शेतकर्‍यांनी यावेळी मोठी गर्दि केली होती.
 
Top