नळदुर्ग -: चिकुंद्रा ता. तुळजापूर येथील ग्रामदैवत व परिसरातील भाविक भक्‍तांचे श्रध्‍दास्‍थान श्री भैरवनाथ देवस्‍थान यात्रेनिमित्‍त श्री भैरवनाथांचा चांगभलं चा जयघोष करीत श्री चा घोडयावरून (छबिना) मिरवणूक सोहळा मोठया उत्‍सहात पार पडला.
   यावेळी येथील यात्रा उत्‍सव कमिटीच्‍या वतीने  विविध धार्मिक व मनोरंजनात्‍मक कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. चैत्र व द्वादशी (12) शनिवार (ता. 26 ) रोजी पहाटे चार ते सायंकाळी सात च्‍या दरम्‍यान श्री भैरवनाथाचा महाभिषेक घालून यात्रेस प्रारंभ झाला. याच दिवशी दिवसभरानंतर चिकुंद्रा व परिसरातून आलेल्‍या भाविकांना पायस (खिर) रूपाने महाप्रसादाचे वाटप करण्‍यात आले. रात्री ठिक 8 वाजता देवाचा घोडयावरून मानाच्‍या काठया नाचवीत नगारा,झांज, चौघडा, हालगी, व ढोल ताशाच्‍या गजरात छबिना (मिरवणूक) काढण्‍यात आला. या मिरवणूक सोहळयात होणारी गुलाल व खोब-याची उदळण आणि श्री भैरोबाचं चांगभलं च्‍या जयघोषाने चिकुंद्रा नगरी व परिसर अगदी दुमदुमून गेला होता. यावेळी मानाच्‍या काठया (ध्‍वजस्‍तंभ) नाचवीत मंदिराच्‍या भोवतीने पाच प्रदक्षिणा घालण्‍यात येवून हा मिरवणूक सोहळा साजरा करण्‍यात आला. मंदिरावरील विदूत रोषणाईने व शोभेची दारू आणि  गावक- यांच्‍या हातातील मशाली यामुळे सारा मंदिर परिसर प्रकाशय झाला होता .याशिवाय दोन दिवसाच्‍या या यात्रेदरम्‍यान भजन, किर्तन, गायन, आदी धार्मिक तसेच जंगी कुस्‍ती स्‍पर्धा, शिवाय मनोरंजनात्‍मक स्‍वरूपाच्‍या  कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते.
 
Top